यवतमाळात बीज प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन
कापसाच्या बीटी बियाण्याऐवजी देशी बियाण्याच्या उत्पादनाकडे महाबीजने लक्ष घालावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केले. वाघापूर मार्गावरील कृषिविज्ञान कार्यालयासमोर नव्यानेच उभारण्यात आलेल्या बीज प्रक्रिया केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसगी बोलत होते.
ते म्हणाले, बोंड अळीवर नियंत्रण मिळविण्याच्या संशोधनातून अस्तित्वात आलेल्या बी.टी बियाण्यांमध्येही बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीत वाढ झाली असून, आता देशी बियाण्यांच्या निर्मितीत राज्याला स्वयंपूर्णतेची गरज आहे. महाबीजने उत्पादनापेक्षा संशोधनाकडे अधिक लक्ष घालावे, प्रक्रिया होत नसल्याने शेतमालाला वाजवी किंमत मिळत नव्हती. त्यातूनच प्रक्रियेची गरज लक्षात घेता यवतमाळात प्रतितास चार टन क्षमता असलेले जर्मन बनावटीचे प्रक्रिया यंत्र बसविण्यात आले. या केंद्रात धान्याच्या गोण्या भरण्याकरिता ऑटोमोशन पध्दतीचे सायलोज बसविण्याची उणीव असून महाबीजच्या अधिकाऱ्यांनी ते तातडीने बसवावे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, असेही  पाटील म्हणाले.
विधानसभेतील एका भाषणाचा हवाला देत ते म्हणाले, राज्य बी महामंडळावर शेतकरी प्रतिनिधी असावे, असे आपण म्हटले होते. जेणेकरून महामंडळ शेतकरीभिमुख होईल. त्यासाठी महाबीजने राज्यातील बियाण्यांच्या निर्मितीत प्रक्रियेत शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे व पूर्वापार चालत आलेली क्षेत्रीय पातळीवरची निव्वळ पध्दती बंद करावी, असा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. देशी बियाण्याच्या निर्मितीवर बोलतांना ते म्हणाले, बोंडअळीचा प्रतिकार करते म्हणून शेतकऱ्यांनी बी.टी.ला पसंती दिली. राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर बी.टी. क्षेत्र पसरले आहे. सध्यस्थितीत या बियाण्यांमध्येही बोगसपणा वाढला असून भांडवलदारी कंपन्यांना आवर घालण्यासाठी हवेतर कृषी विद्यापीठाचे सहकार्य घ्या, अशा सूचनाही महाबीजच्या अधिकाऱ्यांना केल्या.
मोघे यांनी आपल्या भाषणात महाबीजच्या कामगिरीचे कौतुक केले. अध्यक्ष म्हणून बोलतांना आमदार ठाकरे म्हणाले, विखे पाटलांना राज्यातील भागांचा शेतीचा अभ्यास असल्याने ते कृषी खात्याला योग्य न्याय देत आले आहे. प्रत्येक भागाची स्थिती आज वेगळी झाली असून एकीकडे कापसात अग्रेसर असलेले जिल्हे आता सोयाबीनकडे वळत असल्याने त्यावरील प्रक्रिया केंद्र जिल्ह्य़ासाठी फायद्याचे ठरेल, असे सांगितले. दरवर्षी बोगस बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असून त्यासाठी कृषी खात्याने स्वतंत्र पथके नेमावी व शेतकऱ्यांना शुध्द बियाणे मिळेल, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. राज्यात लवकरच कृषीमूल्य आयोग निर्माण होत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक एस.बी. वानखेडे यांनी, तर संचालन विद्या चिंचोरे यांनी केले.

Story img Loader