भारतीय चित्रपटसृष्टीची शंभर वर्ष आणि राज्य चित्रपट पुरस्कारांचे पन्नासावे वर्ष असा खास योग या वेळी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने जुळून आला होता. त्यामुळेच की काय पुरस्कारांच्या या मुहूर्तावर निवडलेल्या सत्कारमूर्तीही तितक्याच खास होत्या. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चॅटर्जी, रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर, अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री रीमा लागू यांना या वेळी विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
मुळात राज्य सरकारचे पुरस्कार म्हणजे आपले मागणे मागण्यासाठीचे एक निमित्त हा गेल्या कित्येक वर्षांचा रिवाज ठरून गेला आहे. यंदा हे मागणं मागितलंय ते अभिनेता नाना पाटेकर यांनी. गेले वर्षभर सातत्याने चित्रनगरीत चित्रीकरणासाठी सवलतीचा जो मुद्दा आहे तो चर्चिला गेला आहे पण, त्यावर ठोस निर्णय अजून राज्य सरकारने घेतलेला नाही. राज्य सरकारने गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठी चित्रपट आणि मराठी मालिकांना चित्रीकरणासाठी सवलतीच्या दरात जागा उपलब्ध क रून द्यावी, अशी मागणी नाना पाटेकर यांनी केली आहे.
मराठी चित्रपटांना सरकारकडून अनुदान दिले जाते. सरकारी अनुदानाच्या कुबडय़ा घ्यायच्या की नाहीत, यावर चित्रपटसृष्टीत अनेक मतमतांतरे असली तरी या अनुदानामुळे अनेक मराठी चित्रपट निर्मात्यांना आधार मिळाला आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. मराठी चित्रपटांना ऊर्जितावस्था यावी यासाठी राज्य सरकारने अनुदान योजना राबवली होती. त्यामुळेच अनुदानाविषयी कोणतेही भाष्य न करता उलट राज्य सरकारने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांसाठी खूप गोष्टी भरभरून दिल्या आहेत. आणखी मागायची गरज नाही हे पहिल्यांदाच मान्य करून सरकारने मराठी चित्रपट आणि मालिकांना चित्रीकरणसाठी सवलतीत जागा उपलब्ध करून द्यावी, असे नाना म्हणाले. आत्तापर्यंत मराठी मालिकांना चित्रनगरीत चित्रीकरणासाठी सुरू झाल्यापासूनचे पहिले वर्ष पन्नास टक्के सवलत देण्यात आली होती. त्यानंतर मात्र त्यांना ठरलेल्या दरात चित्रीकरण करावे लागेल, असे म्हटले होते. आत्ताच्या मालिका या दीर्घकाळ चालवल्या जातात त्यामुळे चित्रीकरणाच्या दरातली वाढ त्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारबरोबर वेळोवेळी झालेल्या चर्चेत या प्रकरणी काही ठोस निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. आम्हाला पन्नास टक्के सवलतीने चित्रीकरणाची परवानगी द्यावी, अशी मराठी मालिका निर्मात्यांची मागणी आहे. नाना यांनीही या मागणीचा पुनरुच्चार केल्याने सरकारदरबारी पुन्हा या प्रश्नाला तोंड फुटले आहे.
अर्थात, याच सोहळ्यात केलेल्या आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुदानाशिवायही चांगले चित्रपट निर्माण झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच सांस्कृतिक विभागाकडून येणारा प्रस्ताव शंभर टक्के मान्य केला जाईल, असे स्पष्ट केले असल्याने मराठी मालिका निर्मात्यांना थोडा दिलासा नक्कीच मिळाला आहे.
यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकर यांना चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानासाठी राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर हा खूप मोठा सन्मान आहे आणि सन्मान मिळतात तेव्हा जबाबदारीही वाढते. शब्द अत्यंत जपून वापरावे लागतात, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचा सन्मान ही या सोहळ्यातील फार महत्त्वाची गोष्ट होती. बासू चॅटर्जी यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा पुरस्कार सोहळ्यांमुळे चित्रपटसृष्टीला उभारी मिळते त्यामुळे दरवर्षी हे सोहळे झाले पाहिजेत, अशी अपेक्षा बासूदांनी या वेळी व्यक्त केली. याशिवाय, ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार तर रीमा लागू यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने या वेळी सन्मानित करण्यात आले.
‘चित्रनगरीत मराठी चित्रपट व मालिकांसाठी सवलत द्यावी’
भारतीय चित्रपटसृष्टीची शंभर वर्ष आणि राज्य चित्रपट पुरस्कारांचे पन्नासावे वर्ष असा खास योग या वेळी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने जुळून आला होता. त्यामुळेच की काय पुरस्कारांच्या या मुहूर्तावर निवडलेल्या सत्कारमूर्तीही तितक्याच खास होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-05-2013 at 12:41 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concession should be given to marathi cinema and serials in chitranagari nana patekar