हिरव्यागर्द वनराईने बहरलेला परिसर मुंबईत कुठे आढळेल, असा प्रश्न जर कुणी केला तर आरे कॉलनी, नॅशनल पार्क यांच्यामागोमाग पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे (आयआयटी) ५६५ एकर जमिनीवर वसलेले संकुल डोळ्यांसमोर येते. परंतु एका बाजूला डोंगरकडा आणि दुसऱ्या बाजूला पवईच्या तलावाकाठी वसलेल्या या संकुलातील हिरव्यागर्द वनराईची जागा आकसत असून, त्यावर काँक्रीटचे जंगल फोफावत आहे. प्राध्यापकांची घरे, त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय, पाहुण्यांसाठी विश्रामगृहे तसेच शैक्षणिक इमारती यांच्या बांधकामामुळे या संकुलातील अनेक वृक्षांची गेल्या काही वर्षांत कत्तल करावी लागली आहे. खुद्द आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संकुलाच्या या बदलणाऱ्या चेहऱ्यावर प्रकाश टाकला आहे.
आयआयटीच्या संकुलाची १९६८, २००८ आणि २०१४ या काळातील छायाचित्रेच विद्यार्थ्यांनी तुलनेसाठी जमा केली आहेत. त्यात या संकुलातील वृक्ष, झुडपे, लहान झाडे, हिरवळ कशी कमी होत गेली आहे, याचा दाखला दृश्यरूपात दिसून येतो. १९५० साली आयआयटीचे संकुल पवईच्या नदीकाठी अस्तित्वात आले, तेव्हा हा परिसर काही प्रमाणात हिरव्यागर्द वनराईने नटलेला होता. आयआयटी स्थापन झाल्यानंतर मुद्दाम या परिसरात विविध वनस्पतींचे रोपण करून येथील जैवविविधता वाढविण्यावर भर दिला गेला. २००९ मध्ये ‘वल्र्ड वाइल्डलाइफ फंड’द्वारे करण्यात आलेल्या पाहणीत या संकुलामध्ये ८४३ प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या देशी-परदेशी जाती-प्रजाती आढळून आल्या होत्या. यापैकी काही दुर्मीळही होत्या.
असा हा नैसर्गिक विविधतेने नटलेला परिसर काँक्रीटचे जंगल होऊ लागला आहे. संस्थेच्या विस्तारीकरणासाठी झाडांची सर्रास कत्तल होते आहे. याशिवाय मुळापासून झाडे उखडून अन्य ठिकाणी स्थलांतरित केली जात आहेत, अशी विद्यार्थ्यांची खंत आहे. आयआयटीअन्सच्या ‘इनसाइट’ नामक नियतकालिकाच्या ताज्या अंकात श्रीश वेणुतुरुमिली या विद्यार्थ्यांने याच प्रश्नावर ‘काँक्रीट जंगल’नामक लेख लिहिला आहे. यानुसार शिक्षकांच्या १०० वाहनांच्या पार्किंगसाठी मोठय़ा प्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तसेच नव्या विश्रामगृहामुळे तलावाकाठची ३५ झाडे मुळापासून उखडली गेली आहेत. श्रीश याने लेखात केलेल्या मांडणीनुसार स्टील्ट पार्किंगमुळे येथील काही झाडे वाचली असती.
संकुलातील जैवविविधतेच्या संवर्धनाकरिता मानव विकास मंत्रालयाने २०१३मध्ये सर्व आयआयटीमध्ये ‘ग्रीन ऑफिस’ सुरू करण्याची योजना आखली होती, परंतु गेल्या दोन वर्षांत या संदर्भात एकही बैठक झालेली नाही, असे विद्यार्थी सांगतात.

Story img Loader