कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी शासनाने महापालिकेला कोटय़वधी रुपयांचा निधी दिला आहे. सुमारे ४ कोटी ८६ लाख निधीचा वापर काँक्रीटीकरणाच्या कामासाठी करण्याऐवजी खड्डे भरण्याच्या कामासाठी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत महापालिकेला कोटय़वधी रुपयांचा निधी काँक्रीटीकरणाच्या कामासाठी मिळाला आहे. हा निधी रस्त्यांसाठी खर्च होणे आवश्यक असताना हा निधी खड्डे भरण्यासाठी वापरून निधीचा अपव्यय करण्यात आला आहे. महापालिकेतील फाइल्स पाहिल्यानंतर या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याने जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, काँक्रीटीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडे डांबर प्लॅन्ट नसल्याने त्यांची कामे स्थानिक प्रभागात खड्डे भरण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून करून घेण्यात यावीत. म्हणजे गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डे मुक्त होतील, अशा प्रकारची खेळी करून काँक्रीट कामाचा निधी खड्डय़ांसाठी वापरण्यात येत असल्याचे आयत्या वेळच्या प्रस्तावात म्हटले आहे. याप्रकरणी शहर अभियंता पाटीलबुवा उगले म्हणाले, काँक्रीट कामाचा निधी खड्डे भरण्यासाठी वापरला असला तरी ही रक्कम दोन ते अडीच कोटी किंवा त्याहून कमी आहे. हा प्रस्ताव मंजूर करताना योग्य ते बदल व विहित मार्गाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
त्यामुळे या प्रक्रियेत कोठेही गोंधळ झालेला नाही. ‘काँक्रीट रस्ते निधीतून खड्डे भरण्याच्या कामाची कोणतीही फाइल आमच्याकडे मंजुरीला आली नाही’ असे लेखा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. मार्च ते ऑगस्ट या कालावधीत स्थायी समितीने केवळ रस्ते आणि खड्डे कामांसाठी सुमारे १०० कोटींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.