जिल्ह्यात प्रवासी कार्यकर्त्यांची वानवा
जिल्हा व परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा वृद्धिंगत झाल्यास संघाच्या पश्चिम क्षेत्राचे कार्यालय नाशिकमध्ये स्थापन करण्याची तयारी खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनी दर्शवली असतानाही त्यासाठी निर्धारित केलेले लक्ष्य तीन वर्षांत स्थानिक पदाधिकाऱ्यांना गाठता न आल्यामुळे स्वयंसेवकांच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या कार्यालयापासून नाशिक वंचित राहते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक महानगर, नाशिक ग्रामीण व मालेगाव हे तीन भाग मिळून असणाऱ्या जिल्ह्यात संघाच्या सध्या १३० च्या आसपास शाखा कार्यरत आहेत. सरसंघचालकांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्याने कमी आहे. शाखा वाढविण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या प्रवासी कार्यकर्त्यांची वानवा हे त्यामागील कारण आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठावयाचा असल्याने संघाच्या पश्चिम क्षेत्र कार्यालयाचे स्वप्न अधांतरी बनले आहे.
शहरात तीन वर्षांपूर्वी संघ संस्कार केंद्राची वास्तू अर्थात स्व. नानाराव ढोबळे भारतीय संस्कार केंद्राचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी त्यांनी संघाचे कार्य तळागाळातील घटकापर्यंत पोहोचविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे सूचित केले होते. केंद्राचे उद्घाटन ही औपचारिकता असून काम उभे राहिल्यावर त्यास खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होते, असा दाखलाही भागवत यांनी दिला होता. संपूर्ण देश आज संस्कारांवर उभा आहे. त्यामुळे नियमितपणे संस्कारांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. केवळ वास्तू मोठी असून उपयोग नाही तर कामातील नियमितता वाढली पाहिजे, अशी सूचना करत भागवत यांनी जिल्ह्यात संघाच्या शाखा वाढल्यास पश्चिम क्षेत्र कार्यालय नाशिकमध्ये स्थापण्याची तयारी दाखविली होती. या आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी खरेतर स्थानिक पदाधिकारी व शाखा प्रमुखांवर होती. त्या दृष्टीने संबंधितांमार्फत प्रयत्न होत असल्याचा दावा केला जात असला तरी संघाच्या शाखांची संख्या मात्र सरसंघचालकांच्या अपेक्षेनुसार वाढली नसल्याचे लक्षात येते. संघाच्या शाखांचे प्रभाग शाखा, सायं शाखा व रात्र शाखा असे तीन प्रकार आहेत. संघाच्या कार्याच्या दृष्टीने जिल्ह्याचे नाशिक महानगर, नाशिक ग्रामीण व मालेगाव असे तीन भाग पडतात. त्यात नाशिक ग्रामीणमध्ये ३८ गावांमध्ये शाखा भरतात. पिंपळगावसारख्या काही गावांमध्ये तीन शाखा भरत असल्याचे या विभागाचे संघचालक कैलास साळुंखे यांनी सांगितले. मालेगाव विभागात तीन प्रभाग, चार सायं आणि दोन रात्र अशा एकूण नऊ शाखा भरतात. याशिवाय तीन ठिकाणी ‘साप्ताहिक मीलन’चा उपक्रमही होतो. कळवण तालुक्याचा अपवाद वगळता मालेगाव विभागातील सर्व तालुक्यांमध्ये संघाचे काही ना काही काम सुरू असल्याचे या विभागाचे प्रमुख नाना आहेर यांनी सांगितले. उर्वरित शाखा नाशिक महानगर क्षेत्रात भरतात. या सर्वाचा विचार केल्यास संघाच्या नाशिक जिल्ह्यातील एकूण शाखांची संख्या १३० च्या आसपास आहे. कार्यरत असणाऱ्या शाखांमध्येही परीक्षा व तत्सम काही कारणांमुळे अधूनमधून बदल होत असतात.
सरसंघचालकांनी शाखा वाढविण्याचे जे उद्दिष्ट दिले, त्याच्या निम्म्याच्या जवळपास आता कुठेशी पोहोचणे शक्य झाल्याचे संघाचे पदाधिकारी मान्य करतात. म्हणजे अजून तितक्याच शाखा नव्याने स्थापन करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. प्रवासी कार्यकर्त्यांच्या अभावामुळे शाखा वाढविण्याचा मूळ उद्देश दृष्टिपथास येणे अवघड झाले आहे.
नवी शाखा उभारण्याची जबाबदारी मुख्यत्वे प्रवासी कार्यकर्त्यांवर असते. गावोगावी भ्रमंती करून हा कार्यकर्ता जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा एखादी नवी शाखा उभी राहते. ग्रामीण भागात भ्रमंती करताना अंतरही लांब असते. प्रवासी कार्यकर्ता तेथे पोहोचल्यावर कार्यकर्ते तयार असतीलच याची शाश्वती नसते. रात्रीची शाखा आयोजित करावयाची झाल्यास त्याला मुक्काम करावा लागतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एखाद्या राजकीय पक्ष वा संघटनेसारखे हे लाभाचे वा प्रसिद्धीचे पद नसल्याने कार्यकर्ते मध्येच सोडचिठ्ठी देतात. मन:पूर्वक मेहनत घेऊन हे काम करण्यासाठी कार्यकर्ते मिळत नसल्याने ज्या गतीने शाखा उभारणी व्हायला हवी, त्या गतीने होत नाही. शाखा विस्तार कार्यक्रमात या अडचणी भेडसावत असल्याचे शहर व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या सर्वाचा परिणाम संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यालय स्थापन करण्यासाठी सरसंघचालकांनी दिलेला निकष अपूर्ण राहण्यात झाल्याचे दिसून येते.

Story img Loader