राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आर.आर. उपाख्य आबा पाटील यांच्या निधनाने विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी दुख व्यक्त केले.
आबा आमच्या पक्षाचे नेते होते आणि त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली. ते राजकारणात असले तरी मूळ पिंड समाजकारणाचा होता, त्यामुळे त्यांची नाळ अखेपर्यंत जनसामान्याशी जुळली होती. तंटामुक्त गाव ही योजना आणून ती गावागावात राबविली. सभागृहात एखाद्या विषयावर ते अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद बोलत, त्यामुळे विरोधकांना त्यांना विरोध करण्याची फार वेळ येत नव्हती. त्यांचे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबध होते. त्यांच्या निधनाने पक्षाचे ज्येष्ठ नेतेच नाही तर आमचे मार्गदर्शक गेले, अशा शब्दात माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी भावना व्यक्त केल्या.
पाटील यांच्या निधनाने उत्कृष्ट संसदपटू आणि सवेदनशील नेता हरपला. विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी बुलंद होणारा आवाज त्यांच्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीत्वाची साक्ष देणारा होता. गृहमंत्री म्हणून डान्सबारबंदीसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आपली कार्यक्षमता सिद्ध केली होती. एक कार्यकर्ता ते राज्याचा उपमुख्यमंत्री असा त्यांचा बहुआयामी प्रवास राजकीय क्षेत्रातील प्रत्येकासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
आबांच्या निधनाची बातमी फारच दुखदायक आहे. अलीकडच्या राजकारणातील असे दुर्मीळ राजकारणी व्यक्तिमत्त्व निघून गेल्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचीच नव्हे तर देशाची हानी झाली आहे. सर्वसमान्यांचा नेता म्हणून आबांची ओळख होती आणि ती अखेपर्यंत कायम ठेवली होती, अशा शब्दात वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी शोकसंवेदना व्यक्त केली.
कर्तत्वान माणूस, स्पष्ट वक्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून आबांनी राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले होते. खरे हे वय त्यांचे जाण्याचे नव्हते. सभागृहात विरोधक त्यांना एखाद्या विषयावर विरोध करीत असताना ते त्यांना शांतपणे उत्तर देत. गृहखाते सांभाळत असताना अनेक प्रकरणात त्यांच्यावर टीका झाली. मात्र, त्यांनी ती सर्व अतिशय संयमी राहून शांतपणे हाताळली, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली.
सत्तेची मोठी पदे भूषवित असताना देखील सर्वसामान्य जनतेसाठी सतत उपलब्ध असणारा व त्यांना दिलासा देणारा आधार गमावला आहे, अशा शब्दात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भावना व्यक्त केल्या.
आबा आपल्यात नाही असे वाटत नाही. प्रत्येक पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. अभ्यासू आणि सामान्य माणसांचे प्रश्न मांडणारा नेता म्हणून आंबाची ओळख होती. टीकांकारांना ते अतिशय शांतपणे उत्तर देत असत. ग्राम विकास आणि त्यानंतर गृह विभाग विभागात त्यांनी काम करताना राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले, अशी भावना भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी व्यक्त केली.
आशेने बघता यावे, असा स्वच्छ प्रतिमेचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक असलेल्या आबांनी सामान्य कार्यकर्त्यांला नेहमीच न्याय दिला. ज्याच्याकडे बघून राजकारणात यावे, असे तरुणांना वाटत असे. विदर्भाबद्दल त्यांचा दृष्टिकोन इतरांसारखा नव्हता, असे अनेक दिवस त्यांच्याबरोबर काम केलेले त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव व सध्या काँग्रेस पक्षात असलेले संजय खोडके यांनी सांगितले.
नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्य़ाच्या विकासाठी काम केले. सामान्य घरचा माणूस एखाद्या मोठय़ा पदापर्यंत कसा पोहोचू शकतो हे आबांनी आपल्या कार्यशैलीवरून दाखवून दिले होते, अशी प्रतिक्रिया महापौर प्रवीण दटके यांनी केली. सामान्य माणसांचा चेहरा म्हणून आबांनी राजकारणात ओळख निर्माण केली. त्यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवून ग्रामीण भागातील जनतेला न्याय दिला आहे. पक्षाचा एक मार्गदर्शक गमावला असल्याचे दुख राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी व्यक्त केले.
आबांच्या निधनाने विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांना दुख
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आर.आर. उपाख्य आबा पाटील यांच्या निधनाने विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी दुख
First published on: 17-02-2015 at 07:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Condolence on r r patil death