राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून त्याचे सर्वाधिक चटके सोलापूर जिल्ह्य़ाला सहन करावे लागत आहेत. या दुष्काळी भागाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या २४ मार्च रोजी महाराष्ट्र विकास केंद्र, शेतकरी संघटना, प्रहार संघटना व भारतीय कृषक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ माार्च रोजी माढा तालुक्यातील मोडनिंब येथे दुष्काळ सहवेदना परिषद आयोजिली आहे.
या परिषदेचे उद्घाटन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे (कोल्हापूर) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे राहणार आहेत. या वेळी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर व आमदार बच्चू कडू हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी राज्यातून सुमारे पन्नास हजार दुष्काळग्रस्त शेतकरी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. याबाबतची माहिती रघुनाथदादा पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अनेक मार्ग आहेत. परंतु शासन फक्त टँकर व चारा माफियांना पोसण्यासाठी शासकीयनिधीचा वापर करीत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी मूलभूत कार्यक्रमांवर खर्च होत नाही. १९५२ पासून ‘दुष्काळ आवडे सर्वाना’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक दुष्काळात तोच-तोच कार्यक्रम राबविला जात असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला. हे राज्यकर्त्यांचे अपयश नव्हे तर पाप आहे. परिणामी गरीब-श्रीमंतातील दरी वाढत असल्याचे मतही त्यांनी मांडले.
ते म्हणाले, दुष्काळ हे राज्यकर्त्यांचे पाप असताना त्याबद्दल खडी फोडायला गरीब शेतकरी व शेतमजूर जातो. यापुढे आम्ही खडी फोडायला जाणार नाही. खडी फोडण्यासाठी लागणारी हातोडीऐवजी आता बंदुका हातात घेण्याची वेळ आली आहे, अशीही संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. मध्यंतरी शेतक ऱ्यांना कर्जमाफी मिळाली. परंतु त्याचा लाभ शेतक ऱ्यांना न होता सत्ताधाऱ्यांच्या बँकांना झाला, या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केला. या वेळी जलतज्ज्ञ अनिल पाटील, शेतकरी संघटनेचे मेहमूद पटेल, बाळासाहेब वाळके, हरिदास थिटे आदी उपस्थित होते.