पूरग्रस्त वस्त्या व झोपडपट्टीत आरोग्य शिबिरांचा आग्रह धरणाऱ्या भाजप नगरसेवक व महापौर संगीता अमृतकर यांच्यात मनपाच्या आजच्या आमसभेत चांगलीच खडाजंगी उडाली. भाजप खासदार व आमदारांचे कार्यक्रम जेथे होणार तेथे मनपा कुठलाही कार्यक्रम देणार नाही, असे वक्तव्य महापौरांनी करताच अंजली घोटेकर वगळता भाजपचे सर्व नगरसेवक सभागृहातून बाहेर पडल्याने सभा पूर्ण होण्यापूर्वीच संपली. अतिवृष्टी व मुसळधार पावसाने या जिल्ह्य़ाची व शहराची बकाल अवस्था झाली आहे. मनपा हद्दीतील ५० वस्त्या पुराच्या पाण्याखाली आल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. झोपडपट्टय़ांमध्येही लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. अशातच डेंग्यूची लागण झालेला रुग्ण सापडल्याने परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे झोपडपट्टी व पूरग्रस्त वस्त्यांमध्ये मनपाच्या वतीने आरोग्य शिबिरे घेण्याचा आग्रह भाजपचे नगरसेवक तुषार सोम, बलराम डोडानी व धनंजय हुड यांनी लावून धरला. त्याची सुरुवात झोपडपट्टी कामगार वसाहत या प्रभागातून करावी, अशी सूचना नगरसेवकांनी करताच महापौर संगीता अमृतकर यांनी शिबिरे घेण्याचे मान्य केले. परंतु, कॉंग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात ती घेण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी त्याला विरोध केला. शिबिरे घ्यायची असतील तर सर्व प्रभागांमध्ये घ्या अन्यथा, कुठेच घेऊ नका. मनपाच्या कागदांवर आरोग्य शिबिरांवर कोटय़वधीचा खर्च दिसतो आहे. परंतु, शिबिरे होतात कुठे, हा मुद्दा लावून धरण्यात आला.
त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात मर्जीप्रमाणे येतात, या मुद्यावर महापौर व भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. अतिशय गरमागरमीत ही चर्चा सुरू असतांनाच महापौर संगीता अमृतकर यांनी खासदार व आमदारांचे कार्यक्रम जेथे होतात तेथे आरोग्य शिबिरे घ्यायचे नाही, असे वक्तव्य केले. त्यामुळे भाजपचे नगरसेवक चांगलेच संतापले. हा खासदार-आमदारांचा अपमान आहे. पहिले माफी मागा आणि नंतरच काय ते बोला, असे म्हणून नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र, महापौर माफी मागायला तयार नव्हत्या. त्यामुळे आमच्या नेत्याचा महापौरांनी अपमान केला म्हणून भाजपचे सर्व नगरसेवकांनी सभातग केला. भाजपच्या केवळ अंजली घोटेकर सभागृहात बसलेल्या होत्या. विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी बहिष्कार घातल्याचे बघून महापौरांनीही सभा पूर्ण होण्यापूर्वीच गुंडाळली. त्यामुळे अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चाच झाली नाही. ही सभा सुरू होताच महापौर व स्थायी समिती सभापती यांच्यातही भूमिपूजन कार्यक्रमावरून वाद झाला. एकाच प्रभागातील एकाच पक्षाच्या या दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे बघून सर्व नगरसेवक अवाक झाले. दरम्यान, सभागृहात नगरसेवकांना बसण्यासाठी जागा नसल्याच्या मुद्यावरून भाजप नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जितके नगरसेवक तितक्या खुच्र्या लावणे आवश्यक असतांना दरवेळी कमी खुच्र्या का लावता म्हणून नगरसेवकांनी चांगलीच आदळआपट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict between mayor and bjp corporators
Show comments