स्थानिक रहिवासी, व्यापारी हैराण
रेल्वे स्थानकाजवळील सशुल्क वाहनतळाऐवजी अनेक नागरिक कस्तुरी प्लाझा संकुलाजवळील टाटा लाइनखाली अनधिकृत वाहनतळाचा बिनदिक्कत वापर करीत आहेत. या अनधिकृत वाहनतळावरील वाहनांची संख्या दामदुपटीने वाढल्याने या भागातील रहिवाशांना चालणे अवघड झाले आहे. तसेच, सोसायटीच्या आवारातील वाहने बाहेर काढणे शक्य होत नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. वाहतूक पोलीस शहरभरातील अनधिकृत वाहने रस्त्यावरून उचलत असताना टाटा लाइनखालील वाहनांना ते का ‘आशीर्वाद’ देत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
टिळक रस्त्यावरील स्टेट बँक ते कस्तुरी प्लाझा, शिवमंदिर रस्त्यापर्यंत टाटा कंपनीच्या विद्युत वाहिनीखाली तीनशे मीटरचा रस्ता गेल्या सहा ते सात वर्षांपासून मोकळा आहे.
माजी आयुक्त धनराज खामतकर यांनी टाटा वाहिनीखालील अडीचशे गाळे न्यायालयाच्या आदेशावरून जमीनदोस्त केले होते. त्यामुळे या मोकळ्या जागेत वाहनतळ, बस आगार सुरू करण्याचे प्रस्ताव पालिकेने तयार केले होते. सहा वर्षांत बथ्थड प्रशासनाने यामधील एकही प्रस्ताव अमलात आणला नाही. याउलट टिळक रस्त्याच्या बाजूला टाटा वाहिनीखाली मध्यभागी एक उद्यान बांधून रस्त्याला अडथळा निर्माण केला असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
तीनशे मीटरचा हा रस्ता बेवारस आहे. या रस्त्यावर पालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. स्थानिक मनसेचे नगरसेवक मनोज राजे, कोमल पाटील यांच्याकडून या रस्त्यावरील अनधिकृत वाहनतळ हटवणे किंवा नवीन उपाययोजना करण्याबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने या भागातील नागरिक नाराज आहेत. या दोन्ही नगरसेवकांनी पालिकेकडे गेल्या तीन वर्षांपूर्वी पाठपुरावा करून ही वाहनतळे हटवण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या पत्रांना प्रशासन दाद देत नसल्याचे बोलले जाते.
डोंबिवली पूर्व भागात कोपर पुलाजवळ, पश्चिमेत द्वारका हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत रेल्वे प्रशासनाने दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ सुरू केले आहेत. या वाहनतळांवर वाहने उभी करण्यासाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या दुतर्फा किंवा टाटा लाइनसारख्या रस्त्यांचा फुकट वापर करीत आहेत. रेल्वेने सुरू केलेल्या वाहनतळांना नागरिकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. टाटा लाइनखाली शहरात विविध व्यवसाय, खरेदीसाठी आलेले नागरिक आपली वाहने तासन् तास उभी करून ठेवतात.
या ठिकाणच्या वाहनांना कोणीही हात लावत नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून ठेवण्यात येतात.
यापूर्वीची दोनशे ते तीनशे वाहनांची संख्या आता त्याच्या दुप्पट झाल्याने या भागातून चालणे अवघड झाले आहे. याबाबत या भागातील नागरिक, व्यापाऱ्यांनी एक निवेदन डोंबिवली वाहतूक शाखेला दिले आहे. टाटा लाइनचा रस्ता एकमार्गी करावा. या रस्त्याच्या एका बाजूला वाहने उभी करण्याची मुभा असावी. अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून ताब्यात घ्यावीत, अशा मागण्या नागरिकांनी निवेदनात केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा