काँग्रेस नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण
अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या सदस्यता नोंदणी अर्जावरून नागपूर काँग्रेसमधील गटबाजी चव्हाटय़ावर आल्याने ज्येष्ठ नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. युवक संघटनेतील महत्त्वाची पदे बळकावण्यासाठी पक्षांतर्गत राजकारणाची धुमसणारी ठिणगी आता पेटल्याचे यावरून दिसून आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षबळकटीसाठी जास्तीत जास्त युवकांना काँग्रेसच्या प्रवाहात आणण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यांच्या सूचनेनुसार देशभरात युवक काँग्रेसने सदस्यता नोंदणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दोन गटातील हाणामारीचे गालबोट लागले. देवडिया काँग्रेस भवनात युवक काँग्रेसचे सदस्यत्व मिळविण्यासाठी उसळलेली गर्दी आणि नेतेगिरीचा आव आणणाऱ्या मंत्रिपुत्राला लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज स्वीकारण्यास देण्यात आलेला नकार या कारणांवरून आता चर्चेला तोंड फुटले आहे.
अर्जाची छाननी करण्यासाठी नागपुरात आलेले एलआरओ (लोकसभा निवडणूक अधिकारी) अशोक गर्क या घटनेने पार अवाक्  झालेले दिसले. त्यांनी मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवला होता. इच्छुक तरुणांना अर्ज भरण्याची मुदत संपल्याचे कारण सांगून त्यांचे अर्ज नाकारण्यात आले. वास्तविक सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ होती. परंतु, पावणे पाच वाजताच देवडिया भवनाचे दरवाजे बंद करण्यात आले. यातूनच युवक काँग्रेसमधील महाभारताची ठिणगी पेटली.  प्रभावशाली राजकीय नेत्यांनी त्यांच्या मुलांना संघटनेत स्थान मिळावे यासाठी नव्या सदस्यांचे अर्ज स्वीकारण्यात आडकाठी आणल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या काही विद्यमान सदस्यांनी केल्यामुळे याचे पडसाद नजीकच्या भविष्यात उमटण्याची शक्यता असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांच्या अंतरावर आल्या असताना पक्षश्रेष्ठींपुढे तरुणाईला सांभाळण्याची नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. युवक काँग्रेसच्या निवडणुका पुढील महिन्यात होत आहेत. या पाश्र्वभूमीवर संघटनेतील पदे बळकावण्यासाठी अंतर्गत संघर्षांला सुरुवात झाली आहे. तळगाळातील कार्यकर्त्यांना सदस्यत्व मिळू नये, यादृष्टीने परिस्थिती ‘मॅनेज’ केली जात आहे. यात मंत्रिपुत्रांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असून रोहयो मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र यात आघाडीवर आहेत.  हाणामारी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर देवडिया काँग्रेस भवनात कोऱ्या अर्जाचे गठ्ठे सापडले. फेकाफेकीत हजारो अर्ज भवन परिसरात विखुरलेले दिसले. एका काँग्रेस नेत्याने संगणकाचा वापर करून बोगस अर्जाचा भरणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक अर्जाना ड्रायव्हिंग लायसन्सच्या झेरॉक्स जोडण्यात आल्या होत्या. वस्तुत: मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जोडले जाते. यावरूनच अर्ज बोगस असल्याचा दावा राऊतविरोधी गटाने केला. 

Story img Loader