येथील औद्योगिक वसाहत परिसरातील रेमंड वूलन मिल या कंपनीत दोन कामगार संघटनेतील वाद उफाळून आला असून त्यात राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वातील संघटनेलाच आव्हान दिले गेल्याने कंपनीतील त्यांच्या वर्चस्वाला धक्का लागण्याची चिन्हे आहेत.
जळगावच्या औद्योगिक वसाहत परिसरात प्रतिष्ठित अशा रेमंड कंपनीत एकनाथ खडसे यांचे मार्गदर्शन असलेल्या कामगार उत्कर्ष सभेचे २००२ पासून वर्चस्व होते व हिच संघटना अधिकृत आणि मान्यताप्राप्त असल्याचा या संघटनेचा दावा आहे. तथापि, मनसेचे जिल्हाध्यक्ष तसेच नगरसेवक ललिल कोल्हे यांनी खांदेश कामगार उत्कर्ष संघटनेच्या माध्यमातून कामगार उत्कर्ष सभेला जोरदार आव्हान दिले आहे. कामगार उत्कर्ष सभा ही मान्यताप्राप्त व अधिकृत अशी कामगार संघटना असली तरी आपल्या खांदेश कामगार उत्कर्ष संघटनेलाच कंपनीतील बहुसंख्य कामगारांचा पाठिंबा असल्याचे कोल्हे यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच कामगार उत्कर्ष सभेची मान्यता रद्द करून आपल्या संघटनेला मान्यता मिळावी अशी त्यांची मागणी असून हा वाद न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता आहे.  दरम्यान, रेमंडमध्ये सध्या अस्तित्वातील कामगार उत्कर्ष सभेचे काही पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून कोणताही रजेचा अर्ज न देता कामावर आले नसल्याचे सांगण्यात येते. कामगार संघटनेच्या वादातून विनाकारण वाद नको म्हणून हे पदाधिकारी कामावर येत नसल्याचे सांगितले जाते. कामगार उत्कर्ष सभा आणि खांदेश कामगार उत्कर्ष संघटनेतील वर्चस्वाचा वाद आता कारखान्यातील कामगार व औद्योगिक न्यायालयाच्या आखाडय़ात गेला आहे. त्यातही बहुसंख्य कामगारांचा आपल्याच संघटनेला पाठिंबा असल्याचा खांदेश कामगार उत्कर्षचा दावा आहे. त्यामुळे उद्या जर रेमंडमधील कामगारांचा दावा खरा ठरला तर ती बाब एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाला धक्का देणारी ठरणार आहे.मनसेचे जिल्हाध्यक्ष असलेले कोल्हे जळगाव महापालिकेत नगरसेवक आहेत. २००८ च्या पालिकेत ते एकमेव मनसेचे नगरसेवक होते. त्यानंतर गेल्यावर्षी राज ठाकरे यांची जळगावी झालेली जाहीर सभा, त्या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद व त्यातून मनसेकडे विशेष करुन तरूण वर्गाचा वाढलेला ओघ यातून महापालिकेतील नगरसेवकांची संख्या यंदा बारापर्यंत गेली आहे. जळगाव महापालिकेत मनसेला मिळालेल्या यशाचे श्रेय कोल्हे यांच्याकडेच जाते. एका दशकापूर्वी कोल्हे घराण्याकडे रेमंडच्या कामगार संघटनेची एकछत्री सुत्रे होती. पण, भाऊबंदकीतील वादामुळे खडसे यांच्या नेतृत्वातील संघटनेचा तेथे प्रवेश झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा