* रिक्षा-टॅक्सीला पालकांचे समर्थन
*  ‘स्कूल बस’ चालविताना  शाळांची दमछाक
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी सुधारीत नियमावलीत सर्वाना (काही अपवाद वगळता) ‘स्कूल बस’ सक्तीची करण्याबरोबर या व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकण्यात आल्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत असून रिक्षा व टॅक्सी वाहतुकदारांनी आधीच रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला असताना आता बहुतांश पालक या व्यवस्थेचे समर्थन करत आहे. तसेच शहरातील शालेय विद्यार्थ्यांची संख्या आणि त्या तुलनेत उपलब्ध स्कूल बस अन् एसटी महामंडळाच्या बसेस यांचे प्रमाण पाहिल्यास त्यात प्रचंड तफावत असल्याचे लक्षात येते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने ही सूचना केली असली तरी बससेवा पुरविणाऱ्या शाळा आणि पालकांची मोठी अडचण होणार असल्याचे मत वाघ गुरुजी शाळेच्या मुख्याध्यापिका एम. जे. सोनवणे यांनी सांगितले. सध्या आमच्या शाळेच्या दहा बस कार्यरत असूनही केवळ निम्म्या विद्यार्थ्यांची ने-आण करता येते. उर्वरित विद्यार्थी रिक्षा आणि व्हॅनने ये-जा करतात. ‘स्कूल बस’ सेवा चालविताना चालक मिळणे दुरापास्त झाले आहे. ‘पाच वर्षांचा अनुभव’ ही प्रादेशिक परिवहन विभागाची अट पूर्ण करताना दमछाक होते. अस्तित्वातील बससेवा चालविताना नाकात दम आला असताना संस्था नव्या बसचा विचारही करू शकत नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले. याच शाळेतील माध्यमिकचे मुख्याध्यापक एस. आर. पवार यांनी तशीच प्रतिक्रिया नोंदविताना पालकांपुढे आता आपल्या पाल्यांना शाळेत कसे पोहोचवायचे हा प्रश्न राहील, असे सांगितले.
रिक्षा व टॅक्सीच्या माध्यमातून घरपोहोच सेवा उपलब्ध होते. अंतर्गत भागातील अरुंद रस्ते पाहता त्या पध्दतीने शाळेची बस सेवा उपलब्ध होणार नाही. या बसचे थांबे प्रमुख रस्त्यांवर असतात. तिथपर्यंत पाल्यांना नेण्याची आणि आणण्याची कसरत पालकांना करावी लागेल, असे प्रज्ञा काकडे यांनी सांगितले. उपरोक्त निर्णयामुळे खासगी वाहनांद्वारे पालकांना मिळणारी घरपोहोच सेवा बंद होईल असे अश्विनी साताळकर यांनी सांगितले. दुसरीकडे बसमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढेल. सुरक्षिततेच्यादृष्टिने हा निर्णय कितपत योग्य ठरेल, हा प्रश्नच असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा व व्हॅनपेक्षा बससेवा ही अधिक सुरक्षित असल्याचे डॉ. मनिषा जगताप यांचे म्हणणे आहे. मध्यंतरी आसपासच्या शाळांच्या वेळापत्रकात बदल करुन एसटी बसेस उपलब्ध करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, तो देखील अपयशी ठरला, याकडे शामला देशमुख यांनी लक्ष वेधले.
राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने बस वाहतूक हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे डॉ. गोपाळ सावकार यांनी सांगितले. प्रश्न इतकाच आहे की एसटी महामंडळ किंवा शालेय व्यवस्थापन पुरेशा प्रमाणात बसेस उपलब्ध करून देऊ शकेल का? या बाबत शालेय व्यवस्थापन, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या विविध संघटनांनी जवळच्या अंतरासाठी मिनी बसेस उपलब्ध करून दिल्या, त्या वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण तसेच परवाने दिले तर हा प्रश्न निकालात निघू शकेल. त्यासाठी शालेय व्यवस्थापन आणि विद्यार्थी वाहतूक संघटना यांनी समन्वय साधणे गरजेचे असल्याचे डॉ. सावकार यांनी नमूद केले.
बससेवेचा पर्याय चांगला असला तरी नोकरदार पालकांसाठी तो स्वीकारणे जिकिरीचे ठरणार असल्याचे आसावरी पंडित यांनी सांगितले. कारण, व्हॅन किंवा रिक्षा घरपोहोच सेवा देत असल्याने सर्वाच्या वेळेची बचत होते. पण, या वाहनांमध्ये कोंबलेले विद्यार्थी पाहिल्यावर बस प्रवास सुरक्षित वाटतो.
शाळांनी बस सेवा बंद केल्याने नाईलाजास्तव पालकांना खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारणे भाग पडले. शाळेकडून बससेवा देताना ती रास्त दरात दिली असावी, इतकीच अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.

शहरात सध्या ५२५ ‘स्कूल बस’
शहरात सध्या ५२५ ‘स्कूल बस’ कार्यरत असून त्यात काही शैक्षणिक संस्थांच्या तर काही संस्थांनी करार पध्दतीने दिलेल्या खासगी व्यावसायिकांच्या आहेत. या माध्यमातून दररोज हजारो विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. ‘स्कूल बस’ची सुविधा उपलब्ध करणाऱ्या बहुतांश शाळा इंग्रजी असून मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या अतिशय कमी आहे. ज्या शिक्षण संस्थांची स्वत:ची स्कूल बस सेवा कार्यान्वित आहे, त्यांना ती चालविताना बरीच कसरत करावी लागते. स्कूल बससाठी चालकाची नेमणूक करताना त्याला पाच वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे. ही बाब शाळांसाठी अडचणीची ठरली. असा अनुभव असणारे चालक मिळत नाहीत. त्यामुळे कार्यरत असणारा एखादा चालक मध्येच नोकरी सोडून गेला की, वेगळीच समस्या भेडसावते. ज्या शाळांमध्ये त्रयस्थ खासगी व्यावसायिकाच्या मदतीने स्कूल बसची सेवा आहे, तिच्या नियोजनात अनेक त्रुटी आहेत. मध्यंतरी रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तसाच प्रकार घडला. आधी या शाळेत संस्थेमार्फत ही सुविधा पुरविली जात होती. परंतु, यंदाच्या शैक्षणिक वर्षांत खासगी वाहतुकदाराकडे ती जबाबदारी सोपविली गेली. काही कारणास्तव शाळेने ही व्यवस्था अचानक बंद करून टाकली. आता पालकांनी पाल्याला कसे शाळेत आणावे व सोडवावे याचा निर्णय घ्यावा, असे सांगून शाळेने सर्वाना वाऱ्यावर सोडून दिले. या घडामोडीत पाल्याबरोबर पालकही भरडले गेले.  स्कूल बसची व्यवस्था ही बाब आर्थिक बाबीशी निगडीत असल्याने संस्था नव्याने त्या खरेदीसाठी उत्सुक नाहीत. विद्यार्थ्यांना स्कूल बसची सक्ती करताना हे मुद्दे विचारात घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Story img Loader