४७.६ आणि ४९ अंशाचीही नोंद
विदर्भात उष्णतेची अभूतपूर्व लाट आली असून काल रविवारप्रमाणेच आज सोमवारीही राज्यात सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपुरात घेण्यात आली आहे. उष्णतेचा इतका पारा बघून लोक धास्तावले असून रस्ते अक्षरश: ओस पडले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने चंद्रपूर शहरात पाहुणे येणे बंद झाले आहेत, तर ‘वेदर सिटी’ या संकेतस्थळावर चंद्रपूरचे तापमान ४९ अंशापर्यंत दाखविण्यात आले आहे. त्यामुळे खरे तापमान कोणते, हा संभ्रम निर्माण झाला आहे.
एप्रिलला सुरुवात होताच सूर्याने आग ओकणे सुरू केले. गेल्या आठवडय़ात जेथे पावसामुळे वातावरण थंड व दमट होते तेथे शुक्रवारपासून पारा वाढायला सुरुवात झाली. शनिवारी ४३ अंश तापमानाची नोंद घेतल्यानंतर काल रविवारी अचानक उष्णतेची लाट आली असून पारा ४७.६ अंशावर गेला आहे, तर आज सोमवारी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर पारा ४७.६ अंश इतकाच दाखवित आहे, तर ‘वेदर सिटी’ या संकेतस्थळावर ४९ अंशापर्यंत तापमान गेल्याचे दाखविले आहे. काही साईटवर चंद्रपूरचे आजचे तापमान ४६ अंश दाखविले आहे. त्यामुळे नेमके खरे तापमान कोणते, हा संभ्रम निर्माण झाला आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासूनच उष्णतेने रंग दाखविण्यास सुरुवात केली. १ एप्रिलला जेथे ४०.८ अंश तापमानाची नोंद घेतली गेली तेथे ८ एप्रिलला ४३.२ अंशावर तापमानाचा पारा गेल्याने लोकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारी बारा वाजतापासूनच अनेक शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. उष्णतेचा सर्वाधिक परिणाम बाजारपेठांवर झालेला आहे. मे महिन्याला सुरूवात होताच सूर्य आणखी आग ओकायला लागेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. एकीकडे उन्हाळा वाढत असतांना ग्रामीण व शहरी भागात वीज व पाण्याची समस्या जाणवायला सुरूवात झाली आहे.
सध्या नागपूर व गोंडवाना विद्यापीठाची परीक्षा सुरू आहे. सकाळ व दुपारच्या पेपर असलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय उकाडय़ात पेपर सोडवावे लागत आहेत. बहुतांश महाविद्यालयात फॅन व कुलरची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची घामाने अक्षरश: आंघोळ होत आहे. रणरणत्या उन्हामुळे लोकांनी बाहेर पडणे बंद केले असले तरी सायंकाळच्या वेळी जलतरण तलाव हाऊसफुल्ल होऊ लागले आहेत. हवामान खात्याने येत्या ७ जून पर्यंत उष्णतेच्या लाटेचा सामना विदर्भातील लोकांना करावा लागेल, असे भाकीत केले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर मे महिन्यातील उन्हाळय़ात उन्हाची तीव्र दाहकता सहन करावी लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भात चंद्रपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप बडकेलवार यांना विचारणा केली असता भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर दाखविलेले तापमानच खरे असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
चंद्रपुरातील तीव्र तापमानाच्या वेगवेगळ्या नोंदींवरून संभ्रम
४७.६ आणि ४९ अंशाचीही नोंद विदर्भात उष्णतेची अभूतपूर्व लाट आली असून काल रविवारप्रमाणेच आज सोमवारीही राज्यात सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपुरात
First published on: 30-04-2013 at 01:28 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion about temperature registration in chandrapur on the part of increasing heat