मंगळवेढय़ाच्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षकि सर्वसाधारण सभेत विषय मंजूर करण्याच्या कारणावरून प्रचंड गोंधळ उडाला. संचालक व सभासद शेतकऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या. त्यामुळे अवघ्या १५ मिनिटांतच सभा गुंडाळावी लागली. सभा गुंडाळल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर प्रतिसभा घेऊन कारखान्याच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
तीन वर्षांपूर्वी दामाजी साखर कारखान्याची निवडणूक होऊन त्यात राष्ट्रवादीचे पानिपत होऊन पंढरपूर-मंगळवेढय़ाचे अपक्ष आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला बहुमत मिळाले होते. या परिस्थितीचा राजकीय लाभ काँग्रेसजनांनी उठवत सत्तेत सहभाग नोंदविला असतानाच प्रत्यक्षात कारखान्याचा कारभार पूर्वीच्या राष्ट्रवादीसारखाच चालल्याचा अनुभव सभासद शेतकऱ्यांना येत आहे. तर दुसरीकडे संचालक मंडळामध्येही सत्तेच्या वाटणीवरून बेदिली पसरल्याचे चित्र दिसून येते.
या पाश्र्वभूमीवर कारखान्याच्या झालेल्या वार्षकि सर्वसाधारण सभेत सभासद शेतकऱ्यांचा असंतोष प्रकट झाला. ऊसबिलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी मागणी लावून धरली असता त्यावर झालेल्या चच्रेच्या वेळी गोंधळ सुरू झाला. काही विशिष्ट हितसंबंधी मंडळींच्या पोरकटपणामुळे सभेत गोंधळ झाला. त्यामुळे कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा पंधरा मिनिटांत उरकावी लागली, असे कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे गुरुजी यांनी स्पष्ट केले. कारखान्याचा कारभार काटकसरीने करून आíथक देणी फेडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारखान्याचा संचित तोटा ३१ कोटींवरुन ३ कोटीवर आणला आहे. दुष्काळी परिस्थिती असूनही यंदाच्या गळीत हंगामात चार लाख मे.टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस विकास निधीतून पाच कोटी ३९ लाखाचा निधी मंजूर झाल्याचा दावाही अध्यक्ष काळुंगे गुरुजी यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा