शिवाजी विद्यापीठाच्या प्रथम वर्षांच्या अभियांत्रिकीच्या शनिवारी झालेल्या मॅथॅमिटिक्स विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. विद्यापीठ प्रशासनाने प्रश्नपत्रिकांमध्ये चार प्रिटिंग मिस्टेक असल्याचे स्पष्ट करून विद्यार्थ्यांचा वाया गेलेला वेळ वाढवून देऊन झालेला गोंधळ सावरला.     
प्राध्यापकांच्या संपामुळे विद्यापीठाला परीक्षा घेण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यावर मात करून परीक्षा नियंत्रण विभाग परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र परीक्षा सुरू असताना अडचणी निर्माण होत असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. अभियांत्रिकी विभागाकडील प्रथम वर्षांच्या मॅथॅमिटिक्स विषयाचा पेपर आज होता. फर्स्ट सेमिस्टरचा हा पेपर देण्यासाठी ३५ परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थी जमले होते. त्यांना पेपर वाटण्यात आल्यावर त्यामध्ये काही चुका असल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून परीक्षा केंद्रांमध्ये गोंधळ निर्माण झाला.    
विद्यार्थ्यांनी ही बाब परीक्षा केंद्रांवरील प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रण विभागाशी संपर्क साधला. त्यावर परीक्षा विभागाने चार चुकांची लगेचच दुरुस्ती करून दिली. शिवाय वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी वेळ देण्यात आला. त्यानंतर परीक्षेचे काम सुरळीत सुरू झाले, असा दावा परीक्षा नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी केला.

Story img Loader