गोकुळ दूध संस्थेतील ‘लोणी’ मटकाविण्याचा पदाधिका-यांचा पराक्रम मासिक सभेत उघडकीस आला. अरूण डोंगळे यांनी खरेदी केलेल्या २५ लाख रुपये किमतीच्या आलिशान गाडीवरून सभेत वादावादी झाली.
अध्यक्ष आपल्या समर्थकांचे टँकर वाहतुकीसाठी निवडत असल्याच्या मुद्दय़ावरून संचालक व अध्यक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. पुण्यातील दूध विक्रीचा ठेका, म्हैस दूध दरवाढ या मुद्दय़ांवरूनही अध्यक्षांना लक्ष्य  केले गेल्याने अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.
    संचालक बाबासाहेब चौगुले यांच्या दूध टँकरची मुदत संपल्यामुळे त्यांचा टँकर बंद आहे. त्या ठिकाणी डोंगळे यांनी आपल्या नातेवाईकाच्या टँकरची नियुक्ती केली आहे. तसेच संघामध्ये भ्रष्टाचार करून २५ लाखांची आलिशान गाडी घेतली आहे, असा आरोप करीत चौगुले यांनी डोंगळे यांना धारेवर धरले. दरम्यान पुणे येथील दूध विक्रीच्या ठेक्यावरून आणि वारणा दूध संघाच्या बरोबरीने म्हैस दूध दरात वाढ केल्याच्या कारणावरून संचालकांच्या दोन गटात शाब्दिक चकमक झाली. या बैठकीमध्ये १५.० फॅटच्या दुधास ५४ रुपये दर देण्याचे निश्चित झाले. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या दरवाढीसही काही संचालकांनी विरोध दर्शविला. संचालकांच्या अशा कारभारामुळे गोकुळ दूध संघास जळगाव दूध संघ होण्यास वेळ लागणार नाही, असे मत कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून २९ तारखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर अध्यक्ष बदल निश्चित झाला असल्याचे समजते.

Story img Loader