आगामी लोकसभा निवडणुकीस पुन्हा उभे राहणार नसल्याची भूमिका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केली असून त्यापाठोपाठ आता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे माढा व सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. विशेषत: राष्ट्रवादीअंतर्गत राजकारण रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. तर सोलापूर राखीव मतदारसंघात काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांनीच उभे राहावे म्हणून साकडे घातले आहे. या दोन्ही नेत्यांनी निवडणूक न लढविण्याच्या भूमिकेमुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.
शरद पवार व सुशीलकुमार शिंदे हे दोघेही दिग्गज नेते माढा व सोलापुरातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करीत असल्याने सोलापूरकरांच्या दृष्टीने हीअभिमानाची बाब समजली जात असताना आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या उरट-सुलट चर्चेमुळे दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी दोनवेळा निवडणूक न लढविण्याचा पवित्रा जाहीर केला होता. परंतु ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार पक्षाचा ‘शिपाई’ म्हणून त्यांना पुन्हा निवडणूक लढविणे भाग पडले होते. आता पुन्हा तिसऱ्यांदा त्यांनी निवडणूक न लढविण्याचा मनोदय बोलून दाखविला असला तरी प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीच्यावेळी ते आपल्या भूमिकेवर ठाम राहणार काय, हा खरा सवाल आहे. निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा त्यांनी घेतलेली भूमिका कितपत कायम राहू शकते, यावर काँग्रेसच्या गोटातूनच शंका उपस्थित करीत शिंदे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचा दावा केला जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मागील २००९ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात शेवटच्या क्षणी उतरतले होते. पवार यांची उमेदवारी येण्यापूर्वी या मतदारसंघात राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. पवार काका-पुतण्यांनी त्यावेळी खेळी करून आपला डाव साधला. नंतर पवार यांनी सोलापूर जिल्ह्य़ातील राजकारणावर मजबूत पकड ठेवत वेगळी समीकरणे निर्माण केली होती. तथापि, नंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना पंढरपूर मतदारसंघात उतरवून त्यांना पराभव घडवून आणण्याचे राजकारण खेळले गेल्यानंतर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीत एकसूत्रीपणा न राहता गटबाजी आणखी उफाळून आली. त्यातच ऊस आंदोलन व नंतर भीषण दुष्काळी परिस्थितीत पाणी प्रश्नावर तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्याबाबत बारामतीकरांनी घेतलेल्या प्रतिकूल भूमिकेमुळे त्यांच्याविषयी सोलापूरच्या जनतेत नाराजीचे वातावरण पसरले. एवढेच नव्हे तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. सोलापूरकरांच्या नाराजीबद्दलची कबुली खुद्द शरद पवार यांना द्यावी लागली.
या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीने पुन्हा शरद पवार यांनीच माढय़ातून उभे राहण्यासाठी एका ठरावाद्वारे साकडे घातले होते. परंतु पवार हे आपल्या भूमिकेशी ठाम राहण्याची शक्यता गृहीत धरून माढा मतदारसंघातून आता अन्य नेत्यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत येत आहेत. यात जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. परंतु निंबाळकर व मोहिते-पाटील यांना लोकसभेत जाण्यास रस नसल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी राष्ट्रवादीअंतर्गत दगाबाजीची भीतीही आतापासूनच व्यक्त होऊ लागल्याने ही भीती दूर करून विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण करण्याचे आव्हान आहे. यात शेवटी बारामतीकरांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Story img Loader