लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघातून रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र गवई आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा-कौर यांनी जोरदार तयारी सुरू केली असताना काँग्रेस वर्तुळात मात्र अस्वस्थतेचे वातावरण आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर या मतदार संघात गेल्या निवडणुकीत समीकरणे बदलली, पण शिवसेनेने आपला गढ कायम राखण्यात यश मिळवले. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, रिपब्लिकन पक्षाचे डॉ. राजेंद्र गवई, प्रहार संघटनेचे डॉ. राजीव जामठे, बसपचे गंगाधर गाडे यांच्यात लढत झाली. आनंदराव अडसूळ ४२ टक्के मते मिळवून विजयी झाले होते. ३४ टक्के मते मिळवणाऱ्या रिपाइंच्या डॉ. राजेंद्र गवई यांना पराभव पत्करावा लागला होता.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या १९९१ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह या मतदार संघात झळकलेले नाही. काँग्रेसतर्फे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. अनेक तिकिटोच्छूकांनी आपली दावेदारी मांडली, पण गेल्या निवडणुकीत डॉ. राजेंद्र गवई यांना राष्ट्रवादीच्या कोटय़ातून उमेदवारी मिळाली होती. यावेळीही राष्ट्रवादीचे समर्थन गवई यांनी गृहित धरले आहे. माजी राज्यपाल आणि रिपाइंचे नेते रा. सु. गवई हे राजकारणातून निवृत्त झाले आहेत. १९९१ नंतर सलग तीन वेळा रा. सु. गवई यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. एकदा त्यांना विजय मिळाला, पण या मतदार संघावर शिवसेनेचेच वर्चस्व दिसून आले. जातीय आणि राजकीय समीकरणांमध्ये शिवसेनेच्या बाजूने पारडे झुकल्याचे आतपर्यंत दिसून आले, पण यावेळी काँग्रेसमध्ये वेगळीच अस्वस्थता आहे. दीड दशकांपासून अमरावती मतदार संघात काँग्रेसचे पंजा हे चिन्ह नाही, ही बाब काँग्रेसमधील नव्या पिढीसाठी अस्वस्थतेचा विषय बनली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाटय़ाला अमरावती मतदार संघ सोडण्यात आला होता. आगामी निवडणुकीत आघाडीच्या राजकारणात ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी अनेक स्थानिक काँग्रेस नेते प्रार्थना करताना दिसून येत आहेत. जागा वाटपाच्या तडजोडीला अवधी असला, तरी अनेक नेते पाठपुरावा करण्यासाठी सरसावले आहेत. अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ आणि रिपाइंचे नेत डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह नवनीत राणा-कौर आणि काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेले माजी नगरसेवक किशोर बोरकर, अचलपूरचे नगराध्यक्ष अरुण वानखडे, तसेच इतर पक्षातर्फे माजी मंत्री गंगाधर गाडे, शिवसेनेतून बाहेर पडलेले अपक्ष नगरसेवक दिनेश बूब, पिरॅमिड ग्रूप ऑफ कंपनीचे संचालक गुणवंत देवपारे, डॉ. राजीव जामठे, अशा इच्छूक उमेदवारांची मोठी यादी आहे. काँग्रेस स्वत:चा उमेदवार देईल काय, हाच प्रश्न सध्या चर्चेला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसमध्ये अस्वस्थता
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघातून रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र गवई आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा-कौर यांनी जोरदार तयारी सुरू केली असताना काँग्रेस वर्तुळात मात्र अस्वस्थतेचे वातावरण आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-04-2013 at 01:20 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in congress on the occasion of upcomeing election