पडद्यावर रंगणा-या चित्रपटातील दृश्ये शुक्रवारी कोल्हापूरच्या आखाडय़ात भरगर्दीत पाहायला मिळाली. निमित्त होते अखिल चित्रपट महामंडळाच्या व्दिवार्षिक सर्वसाधारण सभेचे. अ‍ॅक्शन, ड्रामा, इमोशन, कॉमेडी असा चित्रपटात ठासून भरला जाणारा मसाला आजच्या सभेत लाईव्ह पाहायला मिळाला. महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांची बोलती बंद करण्याच्या प्रयत्नात सत्तारूढ व विरोधकात जुंपली होती. याच मुद्यावरून अभिनेत्रींचा थयथयाट उपस्थितांचे मनोरंजन करणारा होता. उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांना भोवळ आल्याने सनसनाटी सभेत अचानक गांभीर्याचे रंग गहिरे झाले, तर मार्मिक शेरेबाजीवरून तणावपूर्ण नाटय़ात हलकेपणा येत राहिला.     
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची शुक्रवारची सभा म्हणजे एक सिनेमाच होता. सिनेमा रंगतदार होण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्यांची पेरणी करून तो रंजक बनविला जात होता. तसाच काहीसा प्रकार या सभेतही कधी कळत तर कधी नकळत येत राहिला. सभेची सुरुवातच दमदार अ‍ॅक्शनने झाली. अध्यक्ष सुर्वे यांनी पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितल्याने प्रारंभीच सर्वाना स्फोटक खाद्य मिळाले. सुर्वे आपल्या कामाची महती सांगत राहिले. मध्येच औचित्य हरवत त्यांनी ‘शरम’ सारखा शब्द वापरल्याने वादाने उचल खाल्ली. त्यातून प्रकरण मुद्यावरून गुद्यावर जाईपर्यंत ताणले गेले. त्यात भर घातली गेली ती उभय बाजूकडच्या महिला कलाकारांनी हातवारे करीत त्यांनी चालविलेल्या भडक स्वरूपाच्या अदाकारीने त्यांच्या समर्थकांनाही काय करायचे कळेना. त्यांचा उथळ स्वरूपाचा थयथयाट हा सभेनंतरही चर्चेचा विषय बनला होता.     
पडद्यावरच्या सिनेमाला साजेसे आणखीही काही प्रसंग सभेच्या पडद्यावर घडत गेले. सुर्वे यांना विरोधकांनी घेतल्यानंतर त्यांना समजाविण्यासाठी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर पुढे सरसावले. त्यांनी मनापासून विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांचे भान हरपले. गहिवरलेल्या अष्टेकरांच्या डोळ्यातून अश्रू आल्यावर त्यांची मुले त्यांना सावरण्यासाठी थेट मंचावर आली. अशातच अष्टेकर यांना भोवळ आली. त्यांना उचलून मंचाच्या मागील बाजूस नेण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रसंगाने गोंधळ सुरू असलेल्या सभेत सन्नाटा पसरला. सुदैवाने अष्टेकर यांच्या प्रकृतीत फारसा बिघाड झाला नव्हता. उलट सावरलेल्या अष्टेकरांनी पुढच्या तासाभरात खणखणीत आवाजात सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. विरोधक प्रकृती बरी नसल्याने इतिवृत्त वाचू नका असे सांगत असतानाही अष्टेकरांनी ताठ कोल्हापुरी बाण्याचे दर्शन घडविले. इतिवृत्त वाचन सुरू असताना अधून मधून मार्मिक शेरेबाजी केली जात होती. त्यामुळे तणावपूर्ण बनलेल्या सभेत मोकळेपणाचा शिडकावाही येत राहिला.