कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या रविवारी झालेल्या वार्षिक साधारण सभेत सत्तारूढ व विरोधी गटातील संघर्ष उफाळून आला. सभाध्यक्ष एस. एस. खोचरे यांच्या भाषणात विरोधकांनी सातत्याने अडथळे आणले. सत्तारूढ गटाने बहुमताच्या जोरावर विषयपत्रिकेतील सर्व विषय मंजूर केल्यावर संतप्त झालेल्या विरोधकांनी तेथेच समांतर सभा घेऊन सभेतील विषय नामंजूर झाल्याचे घोषित केले. समांतर सभेवरून उभय गटामध्ये वादाचे पडसाद उमटले. पोलिस बंदोबस्तामध्ये ही सभा पार पडली.
गेल्या पंधरा दिवसांपासून वार्षिक सर्वसाधारण सभेविषयी दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात होते. त्याचे पडसाद रविवारी प्रत्यक्ष सभेवेळी उमटले. सभाध्यक्ष एस. एस. खोचरे यांनी अध्यक्षीय मनोगत मांडण्यास सुरुवात केली. त्यांच्या भाषणावेळी विरोधकांकडून आक्षेपाचे मुद्दे उपस्थित करीत सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात होता. यातून दोन्ही गटामध्ये खटके उडत राहिल्याने पोलिसांना मध्यस्थी करीत वाद घालणा-या सदस्यांना थांबवावे लागत होते.
अशा गोंधळातच व्याजदर एक टक्क्यांनी कमी करणे, कर्ज मर्यादा १२ लाख रुपये करणे आणि एस.एम.एस. माहिती यंत्रणा सुरू करणे या मागण्या एकतर्फी मंजूर करीत सत्तारूढ गटाने सभा संपल्याचे जाहीर केले. मात्र, ही सभा एकतर्फी झाल्याचा आक्षेप घेत शाहू परिवर्तन आघाडीचे नेते राजेंद्र रानमळे व सहकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सत्तारूढ गटाने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा दावा करत आगामी पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मृत सभासदांच्या नोंदीचा प्रश्न झाल्याचा आरोप अण्णासाहेब चौगुले यांनी केला. सात मृत सभासदांच्या नावाने १० लाख ९७ हजार रुपये खर्च टाकून सत्तारूढ गटाने ढपला पाडला असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या सभेत गोंधळ
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या रविवारी झालेल्या वार्षिक साधारण सभेत सत्तारूढ व विरोधी गटातील संघर्ष उफाळून आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-08-2013 at 01:57 IST
TOPICSगोंधळ
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in kolhapur district primary teachers society