ऐन गणेशोत्सवात नागरिकांना अंधारातून चाचपडत जावे लागत असल्याने आणि विद्युत पुरवठय़ाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. याच मुद्यावरून सभेत खडाजंगी उडाली. सदस्यांचा आक्रमक सूर पाहून आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी २३ सप्टेंबरला मंत्र्यांसोबत होणा-या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले.    
महापालिकेच्या शाहू सभागृहामध्ये आज सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. विद्युत विभागाकडील भंगार साहित्याची लिलाव पद्धतीने विक्री करण्याच्या विषयाचे वाचन सुरू होते. त्याचवेळी निशिकांत मेथे यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. आयआरबी कंपनीने ४९ किलोमीटरचे रस्ते विकासाचे काम शहरात केले आहे. त्यामध्ये विद्युत खांब उभारणीच्या कामाचाही समावेश होता. यापैकी अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरू झालेला नाही. रस्त्यांची देखभालही होत नाही. शहरवासीयांना अंधारात चाचपडावे लागते. विजेचे खांबही चोरीस जाण्याचे प्रकार घडले आहेत. विजेच्या अनेक समस्या कशा निर्माण झाल्या आहेत, याची त्यांनी सविस्तर चर्चा केली.    
मेथे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आयआरबी कंपनीशी याबाबतीत पत्रव्यवहार सुरू असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने नगरसेवक व आयुक्तांच्यात खडाजंगी उडाली. भंगार विद्युत खांबांचे वर्गीकरण देण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यावर प्रशासनाने एकूण २५० जुने खांब जमा झाले आहेत. त्यापैकी २४२ बसविण्यात आले असून १७ भंगारात जमा असल्याचे सांगितले. मात्र प्रशासन चुकीची माहिती देत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. खांब काढण्याची परवानगी न घेताच प्रशासन कारवाई करीत असल्याचे सदस्यांनी सांगितले. हा विषय बराच काळ चर्चेत राहिल्यानंतर आयुक्त बिदरी यांनी मंत्र्यांसमवेत होणा-या बैठकीवेळी याप्रश्नी तोडगा काढण्याचे मान्य केले.