सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेल्या वादात सोमवारी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप पाटील यांना त्यांच्या समर्थक संचालकांसह कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतून बाहेर काढले. यामुळे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील समर्थक आणि आमदार संभाजी पवार समर्थक यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. या वेळी निर्माण झालेल्या गोंधळात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
सर्वोदय सहकारी साखर कारखान्याची वार्षकि सर्वसाधारण सभा आज तरुण भारत व्यायाम मंडळाच्या सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी पृथ्वीराज पवार होते. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह काही संचालक व सभासदांनी सहकार न्यायालय क्र.२ येथे कारखान्याच्या विरोधात दावा दाखल केल्याचा राग मनात धरून काही संतप्त सभासदांनी उपाध्यक्ष प्रदीप पाटील आणि त्यांच्या समर्थक संचालकांना बाहेर जाण्यास सांगितले. त्या वेळी पाटील यांनी आम्हीही कारखान्याचे सभासद असून, आम्हालाही प्रश्न विचारण्याचे अधिकार आहे असे म्हणून हातवारे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या काही सभासदांनी पाटील व त्यांच्या समर्थक संचालकांना धक्काबुक्की करीत बाहेर हाकलले. याच वेळी जोरदार घोषणाबाजीमुळे गोंधळ सुरू झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या कारणाने सभेतील वातावरण चांगलेच तापले होते.
ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक युवराज बावडकेर यांनी केले. प्रभारी कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे यांनी विषयपत्रिकेचे वाचन सुरू केले. विशेष सर्वसाधारण सभेचा वृत्तान्त वाचून कायम करणे, ताळेबंद, नफातोटापत्रक स्वीकारणे, अंदाजपत्रकास मंजुरी देणे, वैधानिक लेखापरीक्षकांकडून आलेला लेखापरीक्षण अहवाल व २०१२-१३ या वर्षांचे दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारून नोंद घेणे, २०१३-१४साठी वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करून त्यांचा मेहनताना ठरवणे, आíथक सल्लागारांची नेमणूक करून त्यांचा मेहनताना ठरवणे, साखर आयुक्तांच्या निर्देशानुसार कारखाना सभासदांच्या मालकीचा राहणार याची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करणे असे विषय आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
यानंतर काही सभासदांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर चर्चा करणे, सर्वोदयतर्फे सांगली न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यांची नोंद घेणे, साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ४१ कोटी व त्यावरील व्याज १० कोटी असे ५१ कोटी इतकी रक्कम राजारामबापू कारखान्यास अदा करावी. त्यानुसार निधीसंदर्भात चर्चा करून निर्णय घेणे, चॅरिटेबल ट्रस्ट स्थापणे, दैनंदिन खर्च, कोर्ट खर्च, कारखाना खर्चासाठी घेतलेली अनामत ठेव आदी रकमा अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करणे, या विषयांना मंजुरी देण्यात आली. एस. आर. सबनीस यांची आíथक सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीए म्हणून फडणीस यांची नेमणूक करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सभा समाप्तीनंतर सभासदांसमोर कारखान्याचे संस्थापक आमदार संभाजी पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी अत्यंत कडक शब्दांत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, कारखाना स्थापनेवेळचे अनेक साक्षीदार आहेत. पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी आम्हाला कारखान्याची मंजुरी दिली. यानंतर आम्ही जागेच्या शोधात होतो. कारंदवाडीजवळ जागा पसंत पडली. यासाठी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना भेटलो. जवळपास १०० शेतकऱ्यांनी एकही पसा न घेता आम्हाला जमिनी दिल्या. त्या ठिकाणी असणारी झाडे तोडण्यासाठी व खड्डे काढण्यासाठी मला मोठी मदत केली. आता पशाची मोठी अडचण होती. एमएससी बँकेचे विष्णुअण्णा अध्यक्ष, तर जिल्हा बँकेचे मदन पाटील अध्यक्ष. त्यामुळे पशाची मोठी अडचण होती. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नाने पसे मिळाले.
दरम्यान, उपाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आम्ही साखर कारखाना सभासदांची कारंदवाडीतील कारखाना कार्यस्थळावर समांतर सभा घेऊन स्वतंत्र साखर सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्याचा ठराव मंजूर केला आहे असे सांगितले.
सर्वोदय साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ
सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेल्या वादात सोमवारी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप पाटील यांना त्यांच्या समर्थक संचालकांसह कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतून बाहेर काढले.
आणखी वाचा
First published on: 01-10-2013 at 02:07 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in meeting of sarvodaya sugar factory