आयआयटीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकीचे प्रवेश दिले जातात. या वर्षी आयआयटीने दोन परीक्षा घेतल्या. त्याचा निकाल २३ जूनला लागणार आहे, तर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ३० जूनपर्यंत पूर्ण करावयाची असल्याने प्रवेशासाठीच्या दोन फेऱ्या निघून जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील या घोळाविषयी दाद मागण्यासाठी काही पालक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. तारखांमधील घोळ व अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया या अनुषंगाने प्राध्यापक आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहेत.
राज्यातील ३५० अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेश एकत्रितपणे दिले जातात. राज्यस्तरावर प्रवेशाच्या फेऱ्या ठरविल्या जातात. त्याचे वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले. त्यानुसार २६ जूनपर्यंत पहिल्या फेरीची प्रवेश निश्चितीबाबत माहिती उमेदवाराला कळविली जाईल. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी आयआयटीची परीक्षा दिली आहे, ते त्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवतील. २३ जूनला उत्तीर्ण झालेले विद्यार्थी साहजिकच आयआयटीत प्रवेश घेतील. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या जागा अभियांत्रिकी महाविद्यालयात रिक्त राहतील. दरवर्षी आयआयटीचा निकाल लागल्यानंतर अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. या वर्षी तारखांमध्ये गोंधळ झाल्याने पालक संभ्रमात पडले आहेत. त्यामुळेच काही पालकांनी या प्रक्रियेलाच न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.
तारखांच्या घोळाबरोबरच अभियांत्रिकीत प्रवेश घेताना बाद फेरीचाही घोळ असल्याचे प्राध्यापक आवर्जून सांगतात. या अनुषंगाने बोलताना व्यवसाय समुपदेशक प्रा. श्रीकांत कलंत्री यांनी सांगितले की, या वर्षी दोन प्रकारे घोळ झाले आहेत. तारखांमधील घोळ तर आहेच, पण एखाद्या विद्यार्थ्यांला पहिल्या फेरीत प्रवेश मिळाल्यानंतर त्याला बाद ठरविले जाते. दुसऱ्या फेरीत त्याला अन्य महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध नाही. हा नियम विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचा आहे. कर्नाटक, गुजरात व अन्य राज्यांमध्ये प्रवेशाची एक फेरी पूर्ण झाल्यानंतरही नव्याने महाविद्यालय निवडण्याची संधी विद्यार्थी आणि पालकांना असते. अशी सोय वैद्यकीय क्षेत्रात राज्यातही आहे. मात्र, अभियांत्रिकी प्रवेशात नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. न्यायालयात त्याला आव्हान देण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा