* नेत्यांच्या गोंधळामुळे नगरसेवकही हडबडले
* महापौर आग्रही, आमदार साशंक
* सरनाईकांनी केली चर्चेची मागणी
* प्रकल्पाविषयीचे धोरण अद्याप गुलदस्त्यात
ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी ट्राम गाडय़ांचा पर्याय अमलात आणता यावा, यासाठी आयुक्त आर. ए. राजीव यांनी एकीकडे जोरदार प्रयत्न सुरू केले असले तरी ठाणे महापालिकेची सत्ता भूषविणाऱ्या शिवसेनेत मात्र अजूनही या प्रकल्पाविषयी एकमत होत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. शिवसेनेचे ठाण्यातील तीन आमदार या प्रकल्पांविषयी अद्याप चाचपडत दिसत आहेत. असे असताना महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी मात्र शहरात ट्रामगाडय़ा धावल्याच पाहिजेत, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. महापौरांच्या भूमिकेनंतरही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या प्रकल्पाविषयी एकवाक्यता नाही, असेच चित्र दिसू लागले आहे. महापालिका सभागृहात ट्राम प्रकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतर एकाही सदस्याला त्यावर चर्चा करू देण्यात आलेली नाही, असा आक्षेप ओवळा-माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महापौरांना पाठविलेल्या पत्रात नोंदवला असून शहरातील नागरिकांपुढे सादरीकरण केल्यानंतरच या प्रकल्पाचा विचार केला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे ट्रामसाठी कमालीचे आग्रही असणाऱ्या महापौरांना स्वपक्षातूनच िखडित गाठण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आता रंगली आहे.
ठाण्यातील आनंदनगरपासून घोडबंदर मार्गापर्यंत दहा किलोमीटर अंतरासाठी ट्राम प्रकल्प सुरू करण्याची घोषणा आयुक्त राजीव यांनी केली आहे. ठाणेकरांसाठी अंतर्गत वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वीही वेगवेगळ्या प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शहरात मोनो, मेट्रो यांसारख्या मोठय़ा प्रकल्पांची घोषणा करण्यात आली असून निधीच्या कमतरतेमुळे हे प्रकल्प केवळ कागदावरच राहतील, असे सध्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर राजीव यांनी ट्राम प्रकल्पाची घोषणा केल्याने ठाणेकरांमध्ये या नव्या पर्यायाविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ठाणे महापालिका हद्दीत विधानसभेचे चार मतदारसंघ असून त्यापैकी तीन मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार आहेत. राजीव यांनी या प्रकल्पाची घोषणा करताना एकाही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलेले नाही, असा आक्षेप शिवसेनेच्या आमदारांनी यापुर्वीच घेतला आहे. तसेच आर्थिकदृष्टय़ा योग्य ठरतील, अशाच प्रकल्पांची घोषणा करा, अशी भूमिका घेत ठाण्याची प्रयोगशाळा होऊ देऊ नका, असा टोला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ िशदे यांनी यापूर्वीच महापालिका प्रशासनाला हाणला आहे. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये ट्रामविषयी संभ्रमाचे वातावरण असताना महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी मात्र हा प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतल्याने सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही सध्या संभ्रमात पडले आहे. या प्रकल्पाच्या अंमजबजावणीसाठी नगरसेवकांचा हिरवा कंदील आवश्यक असून नेत्यांची याबाबतची नेमकी भूमिका काय, याविषयी शिवसेनेचे नगरसेवकच संभ्रमात असल्याचे चित्र आहे. ट्राम प्रकल्पाचा अभ्यास सुरू व्हावा, यावरून महापालिका नगरसेवकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. ट्रामसारख्या मोठय़ा घोषणा करण्याऐवजी टीएमटी सक्षमीकरणासाठी पाऊले उचलावीत, असे एका मोठय़ा गटाचे म्हणणे असून काही मात्र महापौर आणि आयुक्तांच्या बाजूने मतप्रदर्शन करत आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटातच या प्रकल्पाविषयी असलेला संभ्रम अगदी स्पष्ट दिसू लागला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महापौर पाटील यांना सोमवारी यासंबंधी एक पत्र धाडले असून खासदार, आमदार, नगरसेवक तसेच ठाण्यातील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमोर या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकल्पास शिवसेनेचा विरोध नाही, मात्र तांत्रिक आणि आर्थिकदृष्टय़ा हा प्रकल्प योग्य ठरला पाहिजे. मुंगेरीलाल के हसीन सपने, असे या प्रकल्पाचे होता कामा नये, असा टोलाही सरनाईक यांनी हाणला आहे. सरनाईक यांच्या या नव्या पत्रामुळे महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची ट्रामविषयी नेमकी भूमिका काय याविषयीचा गोंधळ मात्र अधिकच वाढला आहे.
ठाण्यातील ट्राममुळे शिवसेनेत संभ्रम
* नेत्यांच्या गोंधळामुळे नगरसेवकही हडबडले * महापौर आग्रही, आमदार साशंक * सरनाईकांनी केली चर्चेची मागणी * प्रकल्पाविषयीचे धोरण अद्याप गुलदस्त्यात ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी ट्राम गाडय़ांचा पर्याय अमलात आणता यावा, यासाठी आयुक्त आर. ए. राजीव यांनी एकीकडे जोरदार प्रयत्न सुरू केले असले तरी ठाणे महापालिकेची सत्ता भूषविणाऱ्या शिवसेनेत मात्र अजूनही या प्रकल्पाविषयी एकमत होत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.
First published on: 29-01-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in shivsena on tram in thane