मुंबई पोलीस दलातील निरीक्षकांच्या मोठय़ा प्रमाणात बदल्या झाल्यानंतर सूत्रे स्वीकारण्यासाठी गेलेल्या अनेक निरीक्षकांना आपल्या केबीनमध्ये जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या बदल्यांचे आदेश जारी करताना विद्यमान अधिकाऱ्यांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश जारी न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक पोलीस ठाण्यात एकाच पदावर दोन अधिकारी ठाण मांडून बसल्याची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलीस दल शिस्तप्रिय मानले जाते. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात बदली हवी असते. विशेष शाखेसारख्या ‘अकार्यकारी’ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर ते लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतात. परंतु बदली झालेला अधिकारी आपली बदली रद्द होण्यासाठी प्रयत्नशील असतो. अशावेळी तो पद सोडत नाहीत. आतापर्यंत बदल्यांचे आदेश जारी करताना विद्यमान अधिकाऱ्याला मुक्त करण्याचेही आदेश जारी केले जातात. यावेळी मात्र तसे न झाल्याने प्रचंड गोंधळ माजून शिस्तीच्या पोलीस दलाची ऐशीतैशी झाली आहे.
याबाबत पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बदल्यांचे आदेश जारी झाल्यानंतर ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत अशा अधिकाऱ्यांना तातडीने मुक्त करण्यासाठी बिनतारी संदेश जारी केला जातो. यावेळी तसे न झाल्याने बहुतांश पोलीस ठाण्यात गोंधळ माजला आहे.
मुदतीपूर्वीच बदल्या!
राज्याचे महासंचालक संजीव दयाळ यांनी २७७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करताना ज्यांची तीन वर्षे पूर्ण झाली नसतील त्यांना तेथेच ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी मात्र वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच केल्याने तीन वरिष्ठ निरीक्षक विरुद्ध पोलीस आयुक्त असे वातावरण निर्माण झाले आहे. बदली कायद्यातील तरतुदीनुसार या तिन्ही वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या रद्द करून त्यांना तेथेच ठेवण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. विद्यमान वरिष्ठ निरीक्षकांपैकी ज्यांनी बढती नाकारली त्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. परंतु एखाद्याने बढती नाकारली तरी तो सध्या ज्या पदावर आहे तेथे त्याची तीन वर्षे पूर्ण झाली नसल्यास त्याला बदलता येत नाही. असे असतानाही विनोद सावंत (कुलाबा), जिवाजी जाधव (मुलुंड) यांसह आणखी एका वरिष्ठ निरीक्षकांची (नाव न छापण्याची विनंती केली आहे) मुदतीपूर्वीच बदली केली. या वरिष्ठ निरीक्षकाला फक्त सव्वा वर्ष झाले आहे. सावंत यांच्या जागी टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुपले यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची तर त्या ठिकाणी तीन महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली होती. या बदल्यांना संबंधित वरिष्ठ निरीक्षकांनी महाराष्ट्र न्याय प्राधिकरणाकडे (मॅट) दाद मागितली. प्राधिकरणाने तिघांच्याही बदलीचे आदेश रद्द करताना त्यांना तेथेच नियुक्त करण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपायुक्तपदी बदली करतानाही असाच गोंधळ घालून काही उपायुक्तांना आदेशाधीन राहून हटविण्यात आले होते, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.
अनेक पोलीस ठाण्यात गोंधळ ; एकाच पदावर दोन दोन अधिकारी
मुंबई पोलीस दलातील निरीक्षकांच्या मोठय़ा प्रमाणात बदल्या झाल्यानंतर सूत्रे स्वीकारण्यासाठी गेलेल्या अनेक निरीक्षकांना आपल्या केबीनमध्ये जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या बदल्यांचे आदेश जारी करताना विद्यमान अधिकाऱ्यांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश जारी न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा
First published on: 14-06-2013 at 12:40 IST
TOPICSगोंधळ
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in various police stations two officers on one post