पार्टी मीटिंगला अधिकारी उपस्थित राहात नसल्याच्या कारणावरून सांगली महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या आमसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे सदस्य एकत्र आल्याने प्रचंड गदारोळ माजला. अवघ्या २० मिनिटांच्या घोषणा, प्रतिघोषणांच्या गदारोळातच कोणत्याही चच्रेशिवाय विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याची घोषणा करीत महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर केले. विरोधकांच्या गदारोळामुळे वादग्रस्त ठरण्याची शक्यता असणाऱ्या ड्रेनेज योजनेबाबत झाकली मूठ दीडशे कोटीची अशी स्थिती निर्माण झाली.
विषयपत्रिकेचे वाचन करण्याचा आदेश महापौर कांबळे यांनी देण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्वाभिमानी विकास आघाडीचे गटनेते शिवराज बोळाज, माजी महापौर मनुद्दीन बागवान, विष्णू माने आदींनी विरोधी पक्षांनी बोलावलेल्या पार्टी मीटिंगसाठी प्रशासकीय अधिकारी उपस्थित का राहात नाहीत असा मुद्दा उपस्थित केला. त्याचा जाब विचारण्यासाठी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीचे सर्वच सदस्य महापौरांच्या आसनासमोर धावले. उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पार्टी मीटिंगला उपस्थित रहा अथवा राहू नका असे कोणतेही आदेश प्रशासनाला दिले नसल्याचे सांगत तशी कायद्यात तरतूद नसल्याचे सांगत पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधी सदस्य आणखी संतप्त झाले.
सत्ताधारी गटाचे किशोर जामदार, सुरेश आवटी आदी सदस्य मात्र हा प्रशासन आणि सदस्यांची बाब असल्याचे सांगत शांतच होते. मात्र विरोधी सदस्य या प्रकरणी महापौरांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी करत होते. प्रशासनाचा धिक्कार करीत प्रशासन सत्ताधारी गटाचे बाहुले बंडाचा आरोप करीत सत्ताधारी काँग्रेसच्या आढावा बठकीला प्रशासन अधिकारी कसे उपस्थित राहतात असा सवाल करीत होते. या गदारोळातच स्वाभिमानी विकास आघाडीचे गौतम पवार यांनी घटनात्मक अधिकार नसताना त्रयस्त व्यक्तींनी बोलावलेल्या आढावा बठकीला अधिकारी कसे उपस्थित राहतात असा सवाल उपस्थित करून सत्ताधारी गटाचे मदन पाटील यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले.
विरोधी पक्षाकडून मदन पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करताच संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. या गोंधळातच महापौर कांबळे यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याची घोषणा करीत पिठासीन सोडले.
महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर करताच विरोधी सदस्यांनी पळाले..पळाले..महापौर पळाले.. अशा घोषणा देत सत्ताधारी गटाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे या सभेत कोणत्याही चच्रेविना सर्वच विषय मंजूर झाले. इतिवृत्ताचे वाचन न होता हासुद्धा विषय मंजूर करण्यात आला. मागील सभेत महापौरांनी १४० कोटींच्या ड्रेनेज योजनेबाबत फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले होते. त्याचे नेमके काय झाले हे समजू शकले नाही. मात्र सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी शहरवासीयांवर कराचा कोणताही बोजा न लादता ड्रेनेज योजना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. सुमारे १५० कोटी रुपयांच्या ड्रेनेज योजनेवर सांगोपांग चर्चा आज होऊ शकली नाही. याशिवाय महापालिकेच्या आíथक स्थितीचा लेखाजोखा मांडण्याची संधी कुणालाच उपलब्ध होऊ शकली नाही.
आरोप-प्रत्यरोप
सभेनंतर गटनेते किशोर जामदार यांच्या दालनात महापौर कांबळे यांनी पत्रकारांशी बोलतना सांगितले, की विरोधकांना केवळ गोंधळच माजवायचा होता. त्यांना विकासावर चर्चा करण्याची गरज वाटत नाही. सर्व विषय मंजूर झाले असून यानिमित्ताने काँग्रेस एकसंघ असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. गटनेते जामदार यांनी सांगितले, की आमच्या नेत्याचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. ज्यांना मताचा अधिकार नाही, त्यांनी सभागृहात अवास्तव मुद्दे उपस्थित करून शिस्त बिघडविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे ४३ नगरसेवक एकसंघ असून शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विवेक कांबळे यांनी महापौर मागासवर्गीय महिला असल्याने विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. त्यामुळे त्यांनी अकारण गोंधळ माजवला असे सांगितले.
दरम्यान विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी आज झालेल्या आमसभा बेकायदेशीर असल्याचे सांगून सत्ताधारी गटाला विकासकामावर चर्चाच होऊ द्यायची नव्हती असा आरोप केला. याबाबत चित्रीकरण पाहून आजच्या सभेबाबतचा निर्णय घेण्यात यावा असे निवेदन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि विभागीय आयुक्तांना दिले असल्याचे सांगितले. सत्ताधारी गटाच्या बेबंदशाहीला रस्त्यावर उतरून विरोध करू असेही त्यांनी सांगितले. स्वाभिमानी आघाडीचे गौतम पवार यांनी ऐनवेळच्या विषयात बेकायदेशीर ठराव घुसडण्याचा डाव सत्ताधारी मंडळींचा असल्याचा आरोप करीत २५ कोटींचा भूखंड घोटाळा आमसभेच्या पटलावर उघडकीस येण्याची भीती सत्ताधारी गटाला वाटल्यानेच सभा गुंडाळली असल्याचे सांगितले.
‘ड्रेनेज’ घोटाळय़ावर सांगलीत गोंधळाचे पाणी
पार्टी मीटिंगला अधिकारी उपस्थित राहात नसल्याच्या कारणावरून सांगली महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या आमसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे सदस्य एकत्र आल्याने प्रचंड गदारोळ माजला.
आणखी वाचा
First published on: 21-12-2013 at 02:07 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion over drainage scam in sangli