भारतीय जनता पक्षाच्या जिल्हांतर्गत निवडणुकांमधील वाद वाढतच चालले आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघातील जामखेडपाठोपाठ कर्जत येथील तालुकाध्यक्षाची निवडही लांबणीवर टाकण्यात आली आहे. पारनेर येथे याच निवडीवरून प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळातच जाहीर करण्यात आलेल्या पोपट मोरे यांच्या निवडीला जोरदार विरोध झाला आहे.  
कर्जतच्या तालुकाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सिद्धटेक येथे बैठक झाली, मात्र या पदासाठी कोणाच्याच नावावर एकमत न झाल्याने निवडीचा चेंडू जिल्हा सुकाणू समितीकडे टोलवण्यात आला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष असूनही व मतदारसंघाचे आमदार असतानाही राम शिंदे यांना कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एकमत करून अध्यक्ष निवडता आला नाही .
तालुकाध्यक्षपदासाठी पोपटराव मोरे, अशोक खेडकर, रवींद्र कोठारी, बापू चव्हाण, अनिल मोहिते यांच्यासह ५८ जणांनी अर्ज भरले होते. पक्षाचे क्रियाशील सदस्य ८७ आहेत, त्यातील ५८ जणांना हे पद हवे होते. या सर्वाच्या मुलाखती झाल्या. ५४ जणांनी त्यात माघार घेतली, तरीही अशोक खेडकर, बापू चव्हाण, पोपटराव मोरे व अनिल मोहिते हे चारजण उरले होते यांच्यात मात्र एकमत झाले नाही. यातील कोणीच माघार घेत नसल्याने शेवटी हा निर्णय प्रलंबित ठेवून तो सुकाणू समितीवर सोपवण्यात आला.
पारनेर येथे तालुकाध्यक्षपदासाठी अकरा इच्छुकांनी तयारी दर्शविल्यानंतर चर्चेत त्यातील सात इच्छुकांनी सुभाष दुधाडे यांना तालुकाध्यक्षपद देण्याची मागणी केली, तर तिघांनी पोपट मोरे यांनी पसंती दर्शविली. बहुमत दुधाडे यांच्या बाजूने असतानाही निरीक्षक विक्रम तांबे यांनी पोपट मोरे यांची निवड जाहीर केली. त्यानंतर लगेचच बैठकीत एकच गोंधळ झाला. लोकशाही पद्घतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यापेक्षा हुकूमशाही पद्घतीने पदाधिकारी लादले जात असतील तर त्याची पक्षाला किंमत मोजावी लागेल. मुळात तालुक्यात पक्षाची ताकद कमी असतानाही श्रेष्ठींकडून अशा प्रकारे गटबाजी निर्माण केली जाणार असेल तरी ती खपवून न घेण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

Story img Loader