पर्यावरण सद्य:स्थितिदर्शक अहवाल व प्रदूषण प्रश्नावरून महापालिकेच्या शुक्रवारच्या सभेत प्रचंड गोंधळ झाला. पर्यावरण, शहरातील स्वच्छता, सांडपाणी या प्रश्नावरून नगरसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ई-गव्‍‌र्हनन्स या मुद्यावरून सभेतले वातावरण तापले होते. कोल्हापूर शहरातील पर्यावरण सद्य:स्थितीदर्शक अहवाल महासभेच्या मान्यतेअंती महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडे सादर करण्यास मंजुरी मिळाली, असा प्रस्ताव आजच्या सभेसभोर ठेवण्यात आला होता. याबाबत चर्चा व्हावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. आदिल फरास यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रशासनाने सांगितले की, दरवर्षी अशाप्रकारचा अहवाल शासनाला पाठवावा लागतो. जूनपर्यंत हा अहवाल पाठविणे आवश्यक असते. या वेळी अहवाल मराठी भाषेत बनविण्यात आला आहे. यावर फरास म्हणाले,शहरातील पर्यावरण पोषक नाही, असा अहवालात उल्लेख आहे. याबाबत खुलासा करण्यात यावा. त्यावर प्रशासनाने खुलासा केला की अहवाल बनविण्याचे काम वर्षभर सुरू असते. पाण्याचे नमुने तपासून घ्यावे लागतात. जलशुध्दीकरणाचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पंचगंगा प्रदूषणामुळे प्रशासनावर जे दोष येतात ते निघून जातील. मात्र या खुलाशाने फरास यांचे समाधान झाले नाही. त्यांनी प्रशासन चुकीची माहिती देत असून पर्यावरणाबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप केला.     
पंचगंगा नदीच्या शुध्दीकरणाचे काम मंजूर होऊन बराच कालावधी उलटला आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली. यावरून आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी व शेटे यांच्यात खडाजंगी उडाली. काम वेळेत पूर्ण झाले नाही तर पुन्हा निविदा काढण्यात येतील, असे स्पष्टीकरण आयुक्त बिदरी यांनी दिले.     
आजच्या सभेत पुन्हा एकदा ई-गव्हर्नन्सचा विषय गाजला. महेश कदम यांनी या विषयाला हात घातला.श्रीकांत बनछोडे यांनी या विषयावर विशेष सभा झाली असल्याने पुन्हा चर्चा करून वेळ दवडू नये असे मत मांडले. त्यावरून सभेत गोंधळ सुरू झाला. बनछोडे यांना उद्देशून बोलले गेल्याने काँग्रेसचे नगरसेवक संतप्त झाले. महेश कदम यांना काँग्रेसच्या नगरसेवकांनी लक्ष्य केले. त्यातून जोरदार वादावादी सुरू झाली.तेच ते विषय सतत उपस्थित केले जात असल्याने सभागृहात गोंधळ उडाला. हा प्रकार पाहून महापौर प्रतिभा नाईकनवरे व आयुक्त बिदरी या संतप्त झाल्या. असा प्रकार होऊन सभेमध्ये गोंधळ होऊ नये, अशी अपेक्षा बिदरी यांनी व्यक्त केली.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा