सत्तेचे सिंहासन काबीज करण्यासाठी अद्याप दोन वर्षांचा अवधी असला तरी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालकांमध्ये आत्तापासूनच सामना रंगत चालला आहे. अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान देत संघर्ष समितीचे संचालक व सदस्यांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. सुर्वे यांनी त्यांची बाजू मांडली असली तरी ती मान्य नसल्याचे ठरवत विरोधकांचा संघर्ष करण्याचा इरादा कायम राहिला आहे. ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमावरून संघर्षांची ठिणगी पडली असून अनेक मुद्यांमुळे महामंडळाचा कारभार चर्चेत राहिला आहे. महामंडळाची उद्या शुक्रवारी कोल्हापुरात होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आखाडा रंगणार हे निश्चितच. उभय बाजूकडून सुरू असलेल्या झुंजीमुळे महामंडळाचा कारभार सुधारण्याऐवजी गोंधळात गोंधळ होऊ लागला आहे.
कोणत्याही कलाकृतीमध्ये विशेषत: चित्रपटामध्ये तर एकीने लढण्याऐवजी बेकी केल्यास अपयशाला सामोरे जावे लागते अशाप्रकारचा उदात्त संदेश दिलेला असतो. मात्र आपल्या संदेशाकडेच पाठ फिरवत चित्रपट महामंडळाच्या संचालकांत परस्परांवर प्रहार करण्याची खुमखुमी पसरली आहे. त्याला महामंडळातील अध्यक्षासह संचालकांचा कारभार जसा कारणीभूत ठरला आहे, तसेच केवळ आरोप करणा-या विरोधकांची निष्क्रियताही कारणीभूत ठरणारी आहे. अध्यक्षांचा कारभार मनमानी व भ्रष्ट असल्याचे ठरविणा-या संघर्ष समितीने महामंडळाच्या व एकूण चित्रपटसृष्टीच्या भरीव कामामध्ये योगदान दिल्याचेही जाणवत नाही. त्यामुळे उभय बाजूकडून परस्परांवर शरसंधान सुरू असले तरी चित्रपटनिर्मितीच्या कामामध्ये गर्क असलेल्या निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ हे मात्र या वादाकडे पाठ फिरवून राहिले आहेत.
गेली काही दिवस महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे हे मुख्यत्वे करून संघर्ष समितीच्या रडारवर आहेत. पुणे येथे ‘मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम सादर करताना सुर्वे व त्यांना मानणा-या संचालकांनी ५४ लाख रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप केला आहे. खेरीज मुंबई कार्यालयातील साडेसात लाख रुपयांची पेटीकॅश कोणाच्या खिशात गेली आहे, असा मुद्दा उपस्थित करून संघर्ष समितीने सुर्वे यांना घेरले आहे.
तर सुर्वे यांच्या मतानुसार ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमामध्ये त्यांनी एका पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. झी टीव्हीकडून मिळालेले २५ लाख, महामंडळाने तरतूद केलेले १० लाख असा ३५ लाखांचा हिशोब तयार आहे. उर्वरित रक्कम ते आपल्या खिशातून महामंडळाकडे भरणार आहेत. इतकेच नव्हेतर वर्षअखेरपर्यंत महामंडळाच्या तिजोरीत काही लाखाचा निधी शिल्लक ठेवण्याचाही त्यांनी इरादा व्यक्त केला आहे. महामंडळाचे बिघडलेले अर्थकारण सुधारण्याचा आपला कारभार पसंत न पडल्याने विरोधकांना पोटशूळ उठली असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला आहे. पुणे येथे कार्यालय बंद पाडल्याचा सुर्वे यांच्यावर आणखी एक आरोप झाला होता. मात्र जुलैअखेरीस पुण्यातील कार्यालय सुरू करून दाखवून त्यांनी विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेतली आहे. जुन्या मराठी चित्रपटांमध्ये भाऊबंदकीच्या कथानकाभोवती सारा मामला उभा असे. महामंडळाच्या कारभारातही काहीसे असेच झाले आहे. प्रसाद सुर्वे व मेघराज राजभोसले हे जवळचे नातेवाईक असलेतरी महामंडळाच्या कारभारावरून त्यांच्यातील भाऊबंदकी पुढे आली आहे. प्रसाद सुर्वे, कार्यवाह सुभाष भुरके व त्यांच्या सोबत असलेल्या संचालकांना संघर्ष समितीने आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. विद्यमान संचालक मंडळाने आपण केलेल्या कारभारामुळे महामंडळाच्या कामाला गती आली आहे. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत, असे स्पष्ट केले आहे. तरीही त्यांच्या उधळपट्टीच्या कारभाराला संघर्ष समितीने आव्हान देत सात प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यावरूनच शुक्रवारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा एकदा वादाची भर पडणार आहे. सातत्याने संघर्षांतच गुंतून राहिलेल्या महामंडळाला खरीच ऊर्जितावस्था येणार का, हा मराठी चित्रपटप्रेमींना सतावणारा प्रश्न मात्र या वादात अनुत्तरित राहात आहे.
चित्रपट महामंडळात ‘मानाचा मुजरा’वरून संघर्षांची ठिणगी
सत्तेचे सिंहासन काबीज करण्यासाठी अद्याप दोन वर्षांचा अवधी असला तरी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालकांमध्ये आत्तापासूनच सामना रंगत चालला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-08-2013 at 02:01 IST
TOPICSगोंधळ
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion over manacha mujra in film corporation