सांगली महापालिकेतील स्वीकृत आणि स्थायी सदस्य निवडीवरून सुरू झालेला काँग्रेसअंतर्गत संघर्षांचे मूळ मिरजेतील जामदार-नायकवडी या राजकीय सत्तासंघर्षांतच असल्याचे चच्रेवरून स्पष्ट होत आहे. या निवडी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच झाल्याचे गटनेते किशोर जामदार ठामपणाने सांगत असताना काही कार्यकत्रे पारदर्शकता नसल्याचा आरोप करीत राजीनाम्याची मागणी पुढे रेटत आहेत. स्थायी समितीसाठी निवड झालेल्या काँग्रेसच्या ९ सदस्यांनी गटनेत्याकडे राजीनामे सोपविले असले तरी अद्याप तीन स्वीकृत सदस्यांनी राजीनामे देण्याचे टाळले आहे. पक्षाचे नेते मदन पाटील ज्या वेळी आदेश देतील त्याचवेळी याबाबत निर्णय घेऊ असे सांगत राजीनामा देण्यास टाळाटाळ सुरू आहे.
सांगली महापालिकेची काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा वाढल्या होत्या. पक्षांतर्गत संघटनांच्या माध्यमातून विरोधी पक्षावर आंदोलने करून जनमताचा दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसची सत्ता पुनस्र्थापित करण्यात या संघटनांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागली नाही त्यामुळे पुन्हा राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
स्थायीच्या ९ सदस्यांनी दिलेले राजीनामे अद्याप गटनेते किशोर जामदार यांच्याकडेच असून, यासंदर्भात मदन पाटील जो निर्णय घेतील तो नगरसेवकांना मान्य असेल असे सांगत या बाबतचा निर्णय नेतृत्वावर सोपविण्यात आला आहे. स्थायी सदस्य निवडीसाठी काँग्रेसच्या ९ जागांपकी ४ जागा मिरजेसाठी १ जागा कुपवाडसाठी आणि उर्वरित ४ जागा सांगलीसाठी असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मिरजेच्या नगरसेवकांनी ४ जागा निश्चित केल्या आणि उर्वरित ५ जागांसाठी मदन पाटील यांनी नावे सुचविली होती. त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही असे गटनेते जामदार सांगतात. स्वीकृत सदस्यांची नावे असणारा लिफाफा पक्षनेत्यांनीच दिला, त्यामुळे त्यांच्याकडे राजीनामा मागण्याची जबाबदारी पर्यायाने नेतृत्वाकडेच आहे असेही त्यांनी सांगितले.
सध्या महापालिकेत सुरू असलेल्या सत्तासंघर्षांचे मूळ मिरजेतील जामदार-नायकवडी या राजकीय संघर्षांतच असल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. महापालिका निवडणुकीत नायकवडी घराण्यातील तीन सदस्य निवडून आले आहेत. स्वीकृत सदस्यपदासाठी माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ही संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी हसीना नायकवडी यांना स्थायी सदस्यपदाची देऊ केलेली संधी नाकारली आहे. त्यानंतरच स्थायी आणि स्वीकृत सदस्य निवडीवरून वादाला प्रारंभ झाला.
माजी महापौर नायकवडी आपणाला मागल्या दाराने महापालिकेत प्रवेश करायचा नाही असे सांगत असले तरी, गेले दोन दिवस त्यांचा महापालिकेतील वावर व विरोधी गटाशी  सुरू असलेल्या उघड चर्चा हे कशाचे द्योतक आहे, असा प्रश्न काही काँग्रेस नगरसेवक व कार्यकत्रे उपस्थित करीत आहेत.
स्थायी सदस्यांच्या निवडीवरून निर्माण झालेला राजकीय वादंग हा एकाअर्थी स्थायी समिती सभापतिपदासाठी असल्याचे दिसून येत आहे. हे सभापतिपद नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या विना निविदा कामांच्या मंजुरीसाठी हवे असावे, यामध्ये काही ठेकेदार गुंतले असावेत असाही एक प्रवाह या चच्रेत आहे.
दरम्यान, महापालिकेतील काँग्रेसअंतर्गत सुरू असलेल्या नाराजी नाटय़ामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साही वातावरण आहे. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या गटाला पुन्हा सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. काँग्रेसमधील नाराज लोकांना आपल्या गटाकडे आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसअंतर्गत सुरू असणारा हा संघर्ष अधिक तेवत कसा राहील असे प्रयत्न सुरू असतानाच नाराज नगरसेवकांशी संधानही साधण्यात आले आहे.