काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि महायुतीचे जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. नेमकी कोणती जागा मिळणार आणि कोणती कायम राहणार हे अद्याप स्पष्ट न झाल्याने इच्छुकांमध्ये घालमेल सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केल्यानंतर भाजपच्या इच्छुकांना यावेळी शिवसेनेवर अवलंबून राहावे लागत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झालेला असला तरी विधानसभा निवणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांना सध्या एकमेकांवर अवलंबून राहावे लागत आहे. विदर्भात गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने ११ ठिकाणी उमेदवार केले, त्यापैकी ४ निवडून आले होते. तर काँग्रेसचे २४ उमेदवार निवडून आले. भाजपला १९ तर शिवसेनेला ८ जागा मिळाल्या होत्या.
काँग्रेसच्या यशाची ही टक्केवारी उल्लेखनीय असली तरी लोकसभा निवडणुकीत त्यांचे झालेले पानीपत आणि राष्ट्रवादीचे वाढलेले मताधिक्य बघता यावेळी विदर्भात राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी केली आहे. त्यांच्या पक्षाच्या इच्छुक दावेदारांनी प्रचार सुरू केला आहे. जागा वाटपाबाबत माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल हे काँग्रेससोबत चर्चा करीत आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन विदर्भातील जागा वाढवून घ्याव्या, असेही मत या नेत्याने व्यक्त केले.
जागा वाटपाचे सूत्रच निश्चित झालेले नसल्याने विदर्भातील ६२ जागांपैकी किती कमी होतील, याची धास्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना आहे. सिटिंग- गेटिंग फॉम्र्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना अडचण नाही. मात्र, त्यात जुन्या जागा कमी होतील का, कोणत्या जागांमध्ये बदल होईल, असे प्रश्न इच्छुकांसमोर उभे ठाकले आहेत. उमेदवारीच्या आशा लावून असलेल्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
काँग्रेसमधील बहुतेकांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे. यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या मतदाससंघातूनही इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आतापर्यंत शहरात राष्ट्रवादी काँग्रेसासाठी एकही जागा सोडण्यात आलेली नसल्यामुळे त्यांचे अस्तित्व नव्हते. मात्र, यावेळी पूर्व, पश्चिम नागपूर आणि जिल्ह्य़ात उमरेडची जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आघाडीबाबत घालमेल सुरू असली तरी ऐनवेळी आघाडी झाल्यास बंडखोरी करण्याची बऱ्याच इच्छुकांनी तयारी केली आहे.
भाजप-सेना युतीमध्ये जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू असून कोणाला कोणत्या जागा मिळतील हे अद्याप ठरलेले नसल्यामुळे दोन्ही पक्षांचे दावेदार संभ्रमावस्थेत आहे. दक्षिण नागपूर सेनेकडे असताना भाजपने मागणी केली. शिवाय महायुतीमध्ये असलेल्या शिवसंग्राम पक्षाने त्यावर दावा केला आहे. उत्तर नागपूरची जागा आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, भाजप ही जागा सोडायला तयार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश आणि वाढलेले मताधिक्य बघता शहर आणि जिल्ह्य़ातील एकही मतदारसंघ भाजप सोडायला तयार नाही.
विदर्भातील बहुतेक मतदारसंघातून आघाडी व महायुतीकडे दोन ते तीन प्रबळ इच्छुक दावेदार आहेत. बहुजन समाज पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाला असून विदर्भातील विविध जिल्ह्य़ात उमेदवार उभे करणार आहे. दलित मतांचे होत असलेले विभाजन बघता त्यांनी दलित वस्ती असलेल्या भागात लक्ष केंद्रित केले आहे.
उत्तर नागपूर मतदारसंघात माजी प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये यांना बसपकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला चांगली लढत दिली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नितीन राऊत यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर त्यांच्यासमोर गजभिये यांचे मोठे आव्हान राहणार आहे. यामुळे सध्या तरी सर्वच आघाडय़ांमधील इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू आहे.
आघाडीचे गुऱ्हाळ सुरूच; इच्छुकांचा जीव टांगणीला
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि महायुतीचे जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. नेमकी कोणती जागा मिळणार आणि कोणती कायम राहणार हे अद्याप स्पष्ट न झाल्याने इच्छुकांमध्ये घालमेल सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-09-2014 at 06:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress and ncp still discuss about seat allocation in nagpur