राज्यातील दुष्काळाचे पक्षीय पातळीवर गावनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने दुष्काळ निवारण समन्वय समिती स्थापन केली आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात समन्वय समित्या स्थापन करण्यात येत आहेत. समितीकडून प्राप्त होणाऱ्या अहवालातील माहिती सरकारला देऊन दुष्काळाचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. पक्षाच्या माध्यमातून दुष्काळाचा गावनिहाय आढावा घेऊन राज्य सरकारला पूरक माहिती देण्याचा या मागे हेतू असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी येथे सांगितले.
ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया समन्वयक, तर खासदार भास्करराव खतगावकर, रजनी पाटील, आमदार बसवराज पाटील मुरूमकर, केशवराव औताडे (औरंगाबाद), भीमराव डोंगरे (जालना), अशोक पाटील (बीड), बी. आर. कदम (नांदेड), अ‍ॅड. व्यंकट बेंद्रे (लातूर), अप्पासाहेब कदम (उस्मानाबाद), आमदार सुरेश देशमुख (परभणी) आदी सदस्य आहेत.  
दुष्काळाच्या प्रश्नी राज्यातील आघाडी सरकार चांगले काम करीत आहे, असे प्रशस्तिपत्र देतानाच टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य आहे. त्यासाठी कोणतीही तडजोड करण्याचा प्रश्नच नसल्याचेही ठाकरे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना स्पष्ट केले. राज्यात सर्वत्र विशेषत: मराठवाडय़ात दुष्काळाची तीव्रता जास्त आहे.
मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्य़ांत चित्र अधिक गंभीर आहे. मराठवाडय़ातील दुष्काळाचा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण आढाव घेतला. विभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण करण्यासाठी ७६ कोटी प्राप्त झाले, तसेच जनावरांना चारा व छावण्यांसाठी २८ कोटी देण्यात आले आहेत. रोहयोची कामे व अन्य बाबींसाठी आणखी ३९० कोटी लागतील, असा अंदाज आहे. नेमके किती पैसे दुष्काळ निवारणासाठी हवे आहेत, कोणती कामे तातडीने होणे गरजेचे आहे, निर्णय कशा प्रकारे व्हावेत या दृष्टीने पक्षीय पातळीवर आढावा घेण्यासाठी समन्वय समितीचे प्रयोजन आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात अशा समित्या नेमण्यात येत असून, राज्याच्या समितीने आपल्या अध्यक्षतेखाली काम सुरू केल्याचेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

Story img Loader