काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे जिल्ह्य़ात येऊन गेल्यानंतर लोकसभा मतदारसंघांच्या फेरवाटपाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्या गोटात मतदारसंघ बदलाच्या हालचाली सुरू आहेत, मात्र त्यांच्याच उपस्थितीत नगरला झालेल्या निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्ह्य़ातील दोन्ही जागांवर काँग्रेसचा हक्क सांगण्यात आला. या बैठकीने केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर भाजप-शिवसेनेतही सतर्कता निर्माण झाली आहे.
बाळासाहेब विखे यांच्या उपस्थितीत गेल्या रविवारी नगरला निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. श्रीकांत बेडेकर होते. प्रामुख्याने दक्षिण भागातील कार्यकर्त्यांचा त्यात मोठा समावेश होता. विखेंच्या गोटात पुन्हा एकदा लोकसभेची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे या बैठकीमुळे मानले जाते, त्यामुळेच या बैठकीला विशेष महत्त्व दिले जाते.
माणिकराव ठाकरे नुकतेच शिर्डीला येऊन गेले. जिल्ह्य़ातील लोकसभेच्या मतदारसंघांच्या वाटपाबद्दल त्यांनी फारसे ठोस भाष्य केले नाही, मात्र ते जे काही बोलले त्यालाही या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. शिर्डी व नगर या मतदारसंघाच्या अदलाबदलीबाबत श्रेष्ठी निर्णय घेतील असे सांगतानाच, बदल करायचा झाल्यास त्याला राष्ट्रवादीही तयार हवी असे ते म्हणाले. हा उल्लेखही त्यांनी मोघम स्वरूपातच केला, मात्र विखे समर्थकांच्या बैठकीत त्याचेही तीव्र पडसाद उमटले. या वक्तव्याबाबत स्वत: विखे यांच्यासह अनेकांना आश्चर्य व्यक्त केल्याचे समजते.
बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनेच चर्चा झाली. परंपरेनुसार जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचेच आहेत, त्यामुळे या दोन्ही जागा पक्षालाच मिळायला हव्यात असा सूर विखे समर्थकांनी या बैठकीत व्यक्त केला. यासंदर्भात लवकरच पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन त्यांना ही गळ घालण्याचे या बैठकीत ठरले. मात्र हा दबावतंत्राचा भाग मानला जातो. दोन्ही मतदारसंघांवर हक्क सांगितला म्हणजे आहे त्यात बदल घडवून आणण्याची शक्यता विखे समर्थकांना वाटते.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. मतदारसंघांच्या पुनर्रचनेत कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे नाव शिर्डी झाले, शिवाय तो अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. तत्कालीन वाटणीनुसार तो काँग्रेसकडे व नगर राष्ट्रवादीकडेच राहिला. त्याच वेळी यात बदल करून घेण्याचा विखे यांचा प्रयत्न होता, मात्र राष्ट्रवादीने नगरवरील हक्क न सोडल्याने पूर्वीच्याच वाटणीनुसार दोन्ही काँग्रेसने निवडणूक लढवली.
मतदारसंघ बदलणे विखे समर्थकांना या वेळी तुलनेने सोपे वाटते. गेल्या निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार (तुकाराम गडाख) होता. मात्र निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला, येथे राष्ट्रवादीचा खासदार नसल्यामुळे आता बदल होऊ शकतो असे विखे समर्थकांना वाटते. कार्यकर्त्यांच्या या भावनांना विखे यांनी बैठकीत मूकसंमतीच दिल्याचे समजते. त्यामुळे नजीकच्या काळात दोन्ही काँग्रेसमधील हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होते.
राष्ट्रवादीवर टीका
लोकसभेच्या जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघांवर दावा करतानाच कार्यकर्त्यांनी या बैठकीत राष्ट्रवादीवर चांगलीच टीकाही केली. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवर होणा-या आरोपांमुळे काँग्रेसची नाहक बदनामी होत असल्याच्या भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे जिल्ह्य़ात येऊन गेल्यानंतर लोकसभा मतदारसंघांच्या फेरवाटपाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्या गोटात मतदारसंघ बदलाच्या हालचाली सुरू आहेत,
First published on: 04-07-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress claim on 2 seats of parliament