उत्तर नागपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात नेहमीच काँग्रेसचा वरचष्मा राहिलेला असला तरी यावेळी मात्र परिस्थिती वेगळी असून काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसलाच धक्का देण्याची चिन्हे असून त्यादृष्टीने पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, महायुतीत उत्तर नागपुरात इच्छुकांची संख्या वाढत असताना भाजपसमोर डोकेदुखी वाढली आहे. या मतदारसंघातून नितीन राऊत यांनी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे प्रबळ उमेदवार नसल्यामुळे ही बाब काँग्रेसच्या पत्थावर पडणारी होती. मात्र, यावेळी वातावरण वेगळे आहे. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना ७४ हजार ७४६, विलास मुत्तेमवार यांना ५६ हजार २०६, तर बसपाचे मोहन गायकवाड यांना ३३ हजार ६६३ मते पडली. उत्तर नागपुरात भाजपचे वर्चस्व नसताना गडकरी यांना भरघोस मते या मतदारसंघातून मिळाली.
अडीच ते तीन लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात पन्नास टक्के दलितांची मते आहे. कधी काळी रिपब्लिकन चळवळीचे केंद्रबिंदू ठरलेला, पण नंतर विविध गटात शक्ती विभागली गेल्याने रिपाइंची या मतदारसंघावरील पकड कमी झाली. असे असले तरी हा मतदारसंघ कुठल्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नव्हता. एकही उमेदवार येथून दुसऱ्यांदा विजयी झाल्याची नोंद गेल्या निवडणुकीपर्यंत नव्हती. मात्र, काँग्रेसचे आमदार आणि रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी ही परंपरा मोडीत काढली आणि ते सलग तीन वेळा निवडून आले. याचाच दुसरा अर्थ, रिपाइंच्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून दलित मते काँग्रेसकडे वळली. यावेळीही या मतदारसंघातील चित्र मात्र वेगळे असून राऊत यांना स्वपक्षाकडूनच धोका असून काँग्रेसमध्ये येणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. काँग्रेसचे शहराचे पदाधिकारी राजा द्रोणकर हे राऊत यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. नितीन राऊत यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, अशी त्यांच्या विरोधकांनी मागणी केली असली तरी पक्षाकडेही त्यांच्या तोडीचा व निवडून येण्याची क्षमता असणारा दुसरा उमेदवार सध्या नाही, हे नुकत्याच घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीच्या वेळीच दिसून आले.
भाजपकडून जी नावे पुढे येत आहेत त्यात संदीप गवई, धरमपाल मेश्राम, माजी आमदार भोला बढेल, प्रभाकर येवले व वनिता तिरपुडे यांचा समावेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ते पराभूत झाले होते. भाजपचे युवा नगरसेवक संदीप गवई आणि धरमपाल मेश्राम यांना उत्तर नागपूरमधून लढवण्याची पक्षाची इच्छा असली तरी वाडय़ावरून कोणाचे नाव जाहीर होणार, हे येणाऱ्या काळात ठरणार आहे. बसपाकडून इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, उत्तर नागपुरात त्यांची शक्ती मर्यादित आहे. सध्या तरी राऊत यांना स्वपक्षाकडून कडवे आव्हान आहे, हे मात्र तितकेच खरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress conflict
Show comments