महापालिका स्थायी समितीमध्ये शहराध्यक्ष अभय छाजेड आणि महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांना संधी देण्यात आल्यामुळे पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार घालून गुरुवारी या निर्णयाचा निषेध केला.
स्थायी समितीमध्ये काँग्रेसचे दोन सदस्य जाणार होते. त्यात किमान एका तरी नव्या नगरसेवकाला संधी मिळेल, अशी आशा अनेकांना होती. मात्र, पक्षाने छाजेड आणि व्यवहारे यांना स्थायी समितीवर पाठवल्यामुळे पक्षात मोठी नाराजी आहे. या नाराजीचे पडसाद स्थायी समिती निवडणुकीच्या दिवशी, बुधवारी पक्षकार्यालयात उमटले होते. तेथे या निवडीवरून जोरदार वादावादी झाली होती. त्याचाच पुढचा भाग म्हणून पक्षाचे गटनेता अरविंद शिंदे यांनी गुरुवारी बोलावलेल्या महापालिका पक्षबैठकीवर सर्व नगरसेवकांनी बहिष्कार घातला.
महापालिका सर्वसाधारण सभेपूर्वी सर्वच पक्षांची बैठक गटनेत्याकडून बोलावली जाते. महापालिकेतील पक्षकार्यालयात या बैठका होतात व त्यानंतर सर्व नगरसेवक सभागृहात जातात. सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी तीन वाजता बोलावण्यात आली होती. त्यापूर्वी गटनेता शिंदे यांनी बैठक बोलावली होती. मात्र, पक्षाच्या कार्यालयात काँग्रेसचा एकही नगरसेवक आला नाही. छाजेड आणि व्यवहारे यांच्याकडे पक्षातील महत्त्वाची दोन-दोन, तीन-तीन पदे आहेत. दोघेही अनेक वर्षे नगरेसवक आहेत. संघटनात्मक महत्त्वाची पदेही त्यांना पक्षाने दिली आहेत आणि पुन्हा स्थायी समितीची खिरापत या दोघांनाच का, असा उघड प्रश्न नगरसेवक विचारत असून नवीन चेहऱ्यांना स्थायी समितीमध्ये संधी का दिली नाही, असाही प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader