सांगली महापालिकेत निवडून आलेल्या काँग्रेस नगरसेवकांसाठी कायद्यातील कलमे व तरतुदीं या अभ्यासावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नगरसेवकांना कामकाजाचे धडे देण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर कांचन कांबळे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, सभागृह नेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती राजेश नाईक, माजी महापौर इद्रिस नायकवडी , माजी गटनेते मुन्ना कुरणे,माजी नगरसेवक हणमंत पवार आदी उपस्थित होते.
सांगली महापालिकेची जुल महिन्यात पंचवार्षकि निवडणूक झाली. या निवडणुकीत अनेक नगरसेवक हे पहिल्यांदाच सभागृहात आले. पहिल्याच महासभेत अपूऱ्या ज्ञानामुळे अनेक नगरसेवकांना  सभागृहात नेमकी काय भूमिका मांडावी हे समजले नाही. त्यामुळे महासभेत प्रचंड गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांना महापालिका कामकाजाची माहिती मिळावी, बदलत्या कायद्याची माहिती मिळावी आणि सभागृहात कशी भूमिका मांडावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेत  माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी महापालिका कायद्याची आणि कामकाजाची माहिती सदस्यांना करून दिली. तसेच महासभेच्या कामकाजात कशा प्रकारे सहभागी व्हावे, कायद्याची कोणती बंधने पाळावीत, याबाबत मार्गदर्शन केले. माजी गटनेते मुन्ना कुरणे यांनी नगरसचिव आणि ठरावात होणाऱ्या गोलमाल बाबत आणि एखाद्या विषयाची माहिती घेताना काय भूमिका घ्यावी आणि ती कशा प्रकारे घ्यावी, बोगस कामे कशी ओळखावीत याची नव्या नगरसेवकांना माहिती देत महापालिकेच्या कामकाजाचीही माहिती दिली. माजी नगरसेवक हणमंत पवार यांनीही नूतन नगरसेवकांना महापालिकेच्या महासभेत आपले वर्तन कसे असावे, सभागृहात कोणकोणत्या कारणास्तव कायद्याचा भंग होतो, सभेतील नियमावली काय आहेत याचीही माहिती करून दिली. या कार्यशाळेत नूतन नगरसेवकांनी विद्यार्थी म्हणून हजेरी लावली होती.
 या कार्यशाळेत मिळालेल्या ज्ञानामुळे काँग्रेस नगरसेवक चांगलेच रिचार्ज झाले आहेत. महापालिका कायद्याची परिपूर्ण माहिती आणि कामकाजाच्या अनेक युक्त्या ज्येष्ठ नगरसेवकांनी दिल्या. त्यामुळे पुढील पाच वष्रे हे नगरसेवक चांगला कारभार करतील अशी अपेक्षा आहे. स्थायी समितीचे सभापती राजेश नाईक यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.