गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे व खड्डय़ांमुळे झालेली रस्त्यांची चाळणी या मुद्दय़ावर प्रमुख पक्षांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खड्डेयुक्त रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करीत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह महापालिकेला टीकेचे लक्ष्य करण्याचा प्रयत्न शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी स्वमालकीच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुरू केला. या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद शहर व जिल्ह्य़ाचे राजकारण चांगलेच ढवळून निघण्याची शक्यता आहे. याचाच भाग म्हणून सोमवारी शहरातील महत्त्वाच्या क्रांती चौकात रस्त्यांवरील खड्डय़ांबाबतची नाराजी व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली. खासदार खैरे यांनी मात्र या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचा दावा केला.
शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठे खड्डे तयार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून खड्डय़ांकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ओरड केली जाते आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील संघटना व राजकीय पक्ष महापालिकेच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. नुकतेच छावाच्या वतीने महापालिकेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनीही आंदोलन केले. गणपती विसर्जन मिरवणुकीतही रस्त्यांच्या प्रश्नावर महापालिका व नेते लक्षच देत नसल्याने फलक लिहून, तसेच पथनाटय़ाच्या माध्यमातूनही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. महापालिकेतील अधिकारी व पदाधिकारी या प्रश्नी गंभीर नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. विविध राजकीय पक्ष व संघटनांनी केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर शिक्षणमंत्री दर्डा यांनी वर्तमानपत्राचे माध्यम पुढे करून रस्त्यांवरील खड्डय़ांच्या दुरुस्तीसाठी सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महापालिकेतही खड्डय़ाच्या समस्यांवर उपाययोजना शोधण्याच्या हालचालींना वेग आला. रस्ते दुरुस्तीसाठी ५० कोटींचे कर्ज काढले जाईल, असे स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी जाहीर केले. रस्ते दुरुस्तीची जबाबदारी केवळ महापालिकेची नाही. त्यात आमदार सहकार्य करीत नाहीत, असा आरोपही करण्यात आला. महापौर कला ओझा यांनी राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या मतदारसंघात एकाही रस्त्याचे काम व दुरुस्ती केली नसल्याचा आरोप रविवारी केला. या पाश्र्वभूमीवर हे आंदोलन मोठे होईल, असे सांगितले जात होते. तथापि, आंदोलनाचा फज्जाच उडाल्याचा आरोप शिवसेनेने केला.
सोमवारी क्रांती चौक येथे झालेल्या आंदोलनात रस्त्याचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्यवरांनी सांगितले. तथापि त्यावर तोडगा काय, हे मात्र कोणीच सांगितले नाही. महापालिकांकडे मोठय़ा प्रमाणात निधी नाही. केवळ औरंगाबाद शहरातच खड्डे पडले आहेत, असे नाही. त्यामुळे हे आंदोलन पूर्णत: राजकीय आणि वर्तमानपत्राला पुढे करून केल्याचा आरोप खासदार खैरे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा