संस्थानांचे विलीनीकरण करून अस्तित्वात आलेल्या सध्याच्या भारताचे अखंडत्व कायम राखण्यासाठीच कॉंग्रेसने आणि गांधीजींनी फाळणी स्वीकारली, असे ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी नुकतेच सांगितले. १९४२ च्या ‘चले जाव’नंतर इंग्रज खरोखरच निघून गेले असते तर, दुसरा पर्याय काय याचे उत्तर नसल्यामुळेच गांधीजींनी त्यापूर्वी दोन दशके स्वातंत्र्याचा उद्घोष केला नाही, असेही ते म्हणाले.
‘अक्षरधारा’ तर्फे आयोजित माय मराठी शब्दोत्सव प्रदर्शनांतर्गत ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला’ या पुस्तकाचे लेखक प्रा. शेषराव मोरे यांची डॉ. सदानंद मोरे आणि राजीव साने यांनी मुलाखत घेतली.
प्रा. शेषराव मोरे म्हणाले, ‘‘इंग्रजांनी भारत हिंदूंकडून घेतला की मुस्लिमांकडून हा मुद्दा फाळणीसंदर्भात गौण आहे. दिल्लीचा बादशहा हा तख्तावर असला तरी, तो मराठय़ांचा मांडलिक होता. त्यामुळे हिंदूंकडून भारत घेतला गेला असे म्हटले जाते. पण, या जगाचे राज्यकर्ते मुस्लीमच आहेत हाच मुस्लिमांचा दावा आहे. हिंदूचे राज्य वेगळे आणि मुस्लिमांचे वेगळे राज्य हा मुद्दा सर सय्यद अहमद यांनी १८८८ मध्ये अखंड भारतासाठीच मांडला. याचाच अर्थ हिंदू आणि मुस्लिमांना सत्तेमध्ये ५० टक्के समान वाटा, हा या द्विराष्ट्रवादाचा पाया होता. तर, २४ कोटी हिंदू आणि ६ कोटी मुस्लीम यांच्यासाठी सत्तेचे समान वाटप योग्य नसल्याचे मत आगरकर यांनी ‘सुधारक’मध्ये मांडले होते. इंग्रज भारतामध्ये येण्यापूर्वी येथे किती राज्ये होती हे कोणालाच सांगता येणार नाही. त्यामुळे एका अर्थाने इंग्रजांनीच अखंड भारत केला हे वास्तव नाकारता येणार नाही.’’
मुस्लिमांची इच्छा नसताना केवळ जीनांच्या म्हणण्यानुसार फाळणी होणार असेल तर, माझ्या देहावरून जावे लागेल, असे गांधीजींनी म्हटले आहे. याचाच अर्थ मुसलमानांना नको असेल तर, फाळणी लादू नका, असे त्यांना म्हणायचे होते. गांधीजी फाळणी विरोधी नाहीत, तर मुस्लिमांच्या इच्छेनुसार फाळणीच्या बाजूचेच आहेत. इंग्रज गेले तर, भारतावर मुस्लिमांचे राज्य येईल या भीतीपोटी हिंदू महासभेने स्वातंत्र्याची मागणी केली नाही. त्यांनी १९३७ मध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची मागणी केली, याकडे मोरे यांनी लक्ष वेधले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2012 रोजी प्रकाशित
सध्याच्या भारताचे अखंडत्व कायम राखण्यासाठीच कॉंग्रेसने फाळणी स्वीकारली- प्रा. शेषराव मोरे
संस्थानांचे विलीनीकरण करून अस्तित्वात आलेल्या सध्याच्या भारताचे अखंडत्व कायम राखण्यासाठीच कॉंग्रेसने आणि गांधीजींनी फाळणी स्वीकारली, असे ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी नुकतेच सांगितले.
First published on: 27-11-2012 at 02:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress decided to make partation for indias todays intactness says prof sheshrao more