पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने बंटी जहागीरदार याला अटक केली. आता जहागीरदार याच्यावर कडक कारवाई करून शिक्षा करावी, अशी मागणी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली.
जहागीरदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा समर्थक असून त्याची आई राजियाबी जहागीरदार या नगरसेविका आहेत. पूर्वी तो काँग्रेसमध्ये होता. दोन वर्षांपूर्वी तो राष्ट्रवादीत आला. आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या सूचनेनुसारच पक्षाच्या बैठकीत त्याचा निषेध करण्यात आला. दिल्ली येथील तरूणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे शहराध्यक्ष राजन भल्ला होते. पक्षाने प्रथमच जहागीरदार याच्याविरोधी भूमिका घेतली आहे. सीमारेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीयांची हत्या करुन जवानांचे शीर गायब गेले, त्याचाही या या बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी काँग्रेस पक्ष स्थापना सप्ताहानिमित्त जिल्ह्यात व श्रीरामपूर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन ते यशस्वी केल्याबद्दल बैठकीत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. बैठकीत झालेल्या चर्चेत सिराज काजी, रज्जक पठाण, मुक्तार शाह, नवाज जहागीरदार, बाबा मिसाळ, अबुबकर कुरेशी आदींनी विविध सूचना केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा