लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्कारावा लागल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीकडे राज्यातील नेतृत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे या उद्देशाने २५ जुलै रोजी नागपुरात काँग्रेसचा विदर्भस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश उपस्थित राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोमात तयारी सुरू केली आहे. देवडिया भवनात झालेल्या बैठकीत जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहावे या दृष्टीने अनेक नेत्यांकडे गर्दी जमविण्याची जबाबदारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकताच नागपूरला दौरा करून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेतल्यानंतर काँग्रेसने महायुतीला शह देण्यासाठी रणनीती तयार केली आहे. जिल्ह्य़ाचे नवनियुक्त पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्या पुढाकाराने पहिली बैठक झाली असल्याची माहिती मिळाली. जिल्ह्य़ाच्या पालकत्वाची जबाबदारी मुळक यांच्यावर देण्यात आल्यामुळे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची संख्या बघता हा मेळावा यशस्वी करणे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
मानकापूरमधील क्रीडा संकुलात दुपारी १ वाजता होणाऱ्या या मेळाव्याला प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार विलास मुत्तेमवार, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, मुकुल वासनिक, प्रभारी बाला बच्चन यांच्यासह विदर्भातील आमदार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी नागपूर शहराला २ हजार व जिल्ह्य़ातीन ३ हजार कार्यकत्यार्ंना संकल्प मेळाव्यासाठी आणण्याचे निर्देश पक्षातील नेत्यांनी दिले आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात १४४ जागांची मागणी केली आहे. मात्र, काँग्रेस तेवढय़ा जागा देणे शक्य नाही त्यामुळे राष्ट्रवादीने एकला चलो रे भूमिका घेतली आहे. त्या पाश्र्वभमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी करू शकतात त्यामुळे या मेळाव्याला महत्त्व आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळाले असेल परंतु विरोधकांचे हेआवाहन स्वीकारण्यासोबतच कार्यकत्यार्ंनी विधानसभेची उमेदवारी द्या, राजकीय दबाव टाकून कार्यकत्यार्ंना कडेलोट करू नका, असा इशारा यापूर्वी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिला आहे. या पाश्र्वभूमीवर या संकल्प मेळाव्यात नव्याने काय घडते याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे, हे मात्र तितकेच खरे.
काँग्रेसची निवडणूक तयारी, विदर्भस्तरीय मेळावा शुक्रवारी
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्कारावा लागल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीकडे राज्यातील नेतृत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे या उद्देशाने २५ जुलै रोजी नागपुरात काँग्रेसचा विदर्भस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
First published on: 23-07-2014 at 08:49 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress doing preparations for election in vidarbha