मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २० एप्रिल रोजी येथे होणाऱ्या कापूस परिषदेत अपक्ष आमदार मनीष जैन यांच्यासह शिवसेनेचे आ. सुरेश जैन यांचेही काही समर्थक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
आ. मनीष जैन यांनी या कापूस परिषदेचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री त्या वेळी उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने मनीष जैन हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले आहे. मनीष जैन यांना विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आणण्यात सुरेश जैन यांचा अधिक वाटा आहे. त्यानंतरच्या घडामोडीत घरकुल घोटाळ्यामुळे सुरेश जैन यांच्या नावाचा दबदबा काहीसा कमी झाला आहे. तर दुसरीकडे मनीष जैन यांच्या वाटय़ाला कायमस्वरूपी अपक्ष राहून काहीच येणार नसल्याने त्यांनी कोणत्या तरी पक्षाच्या आश्रयाला जाणे निश्चित मानले जात होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसची निवड केली. काँग्रेसमध्ये सध्या दमदार नेत्यांची वानवा असल्याने तेथे आपल्या नावाचे वलय तयार करण्यात यशस्वी होऊ शकू, असा त्यांचा होरा असावा. मनीष व सुरेश जैन यांचे संबंध लक्षात घेता कापूस परिषदेचे आयोजन आणि काँग्रेस प्रवेश सोहळा सुरेश जैन यांच्याच इशाऱ्यावरून होत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. मनीष जैन यांच्यासह सुरेश जैन यांचे काही समर्थकही काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात आहे. सुरेश जैन यांचे एक खंदे समर्थक माजी उपमहापौर करीम सालार यांनी आपण काँग्रेस विचारसरणीचे आहोत व काँग्रेस आपला आवडता पक्ष असल्याचे म्हटल्याने या चर्चेला दुजोरा मिळत असल्याचे म्हटले जात आहे.
सुरेश जैन समर्थकांचा काँग्रेस प्रवेश?
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २० एप्रिल रोजी येथे होणाऱ्या कापूस परिषदेत अपक्ष आमदार मनीष जैन यांच्यासह शिवसेनेचे आ. सुरेश जैन यांचेही काही समर्थक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आ. मनीष जैन यांनी या कापूस परिषदेचे आयोजन केले आहे.
First published on: 13-04-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress entry by suresh jain supporters