दीडशे वर्षांची महान परंपरा असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांचे नाव काय? जरा ताण दिला तर नाव आठवेल? काँग्रेस सोडून इतर प्रमुख पक्षांच्या महिला अध्यक्षांची नावे सांगता येतील? शिवसेना, भाजपा, अलीकडे शहरी भागात चर्चेत असणारी मनसे? प्रश्नांची नुसतीच दाटी. राजकीय-सामाजिक कार्याचा ठसा असणारे महिला नेतृत्व जणू राज्यात नाहीच! अर्थ एवढाच की, महिला नेतृत्वाची मोठी पोकळी आहे. एका अर्थाने या मैदानावर खेळाडूच नाहीत. भिडू नसलेल्या या मैदानावर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या नावाचा मराठवाडय़ात बोलबाला निर्माण केला गेला. उषा दराडे, सूर्यकांता पाटील ही महिला नेतृत्वाची फळी अधून-मधून चर्चेत असते. काँग्रेसमध्ये अक्षरश: ‘फेसऑफ’ अशी स्थिती होती. रजनीताई पाटील यांच्या नियुक्तीने ती भरून निघण्याची शक्यता आहे. विलासराव देशमुखांनंतर राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर झालेली नियुक्ती जबाबदारीचे भान वाढविणारी असल्याचे सांगत रजनीताई म्हणतात, ‘मराठवाडय़ात महिलांचे संघटन उभे करू!’ सन १९९६ नंतर राज्यसभेवर सुधा जोशी आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रातून महिलांना राज्यसभेचे प्रतिनिधित्व काँग्रेस पक्षाकडून मिळाले नव्हते. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीकडे पाहताना महिलांचे प्रश्न हाताळण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड व्हावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. राज्यातून प्रिया दत्त आणि रजनीताई पाटील या दोन खासदार काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे महिलांच्या प्रश्नी तसा आवाज क्षीण होता. रजनीताई पाटील यांच्या नियुक्तीमुळे मराठवाडय़ातील महिलांचे प्रश्न सरकारदरबारी काहीअंशी मांडले जाऊ शकतील. ज्या मराठवाडय़ात ‘वाडा’, ‘गढी’ आणि बुरख्याचे पाश शिल्लक आहेत, तेथे प्रबोधनाच्या अंगाने काही उपक्रम होण्याची अपेक्षा व्यक्त होते. ज्या महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येतात, त्यांना प्रश्न मांडता येतीलच असे नाही. त्यांचे प्रबोधन करण्याचे काम हाती घेणार असल्याचे रजनीताई पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. महिलांच्या प्रबोधनाची ही प्रक्रिया दहा-वीस वर्षांपर्यंत पूर्ण होणारी नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. केवळ एका पक्षाकडून ते व्हावे, असे नाही. तर सर्वच पक्षांमधून महिलांच्या समस्यांविषयीचा आवाज बुलंद व्हायला हवा. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि मुलींचे प्रश्न हाती घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. मराठवाडय़ातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्नही मांडणार असल्याचे श्रीमती पाटील यांनी सांगितले.
मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांमध्ये राजकीय पटलावर महिला काँग्रेसचा नेता कोण, हा प्रश्न अनुत्तरित होता. रजनीताईच्या निमित्ताने तो चर्चेत आला आहे. त्या येत्या काळात कसे काम करतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर त्यांची नियुक्ती काँग्रेसला किती बळ देईल, हा चर्चेचा विषय आहे.
महिला काँग्रेसने शोधला नवा आधार!
दीडशे वर्षांची महान परंपरा असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांचे नाव काय? जरा ताण दिला तर नाव आठवेल? काँग्रेस सोडून इतर प्रमुख पक्षांच्या महिला अध्यक्षांची नावे सांगता येतील? शिवसेना, भाजपा, अलीकडे शहरी भागात चर्चेत असणारी मनसे? प्रश्नांची नुसतीच दाटी.
First published on: 05-01-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress found new women face