कॉंग्रेस आघाडीने जनतेला निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने एकामागून एक फोल ठरत आहेत. गॅसच्या किमती ४०० रुपयांवरून एक हजार रुपयावर नेऊन ठेवल्या. शेतमालाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा होत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने तर विक्रमच केला आहे. बेरोजगारी वाढली आहे. देशातील व राज्यातील कॉंग्रेस आघाडीचे सरकार जनतेला भुलथापा देत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर यांनी मंगळवारी मालेगाव येथील भाजपच्या जिल्हास्तरीय सभेत केला.
मालेगाव येथील माहेश्वरी भवनात मंगळवारी भाजपच्या जिल्हास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सद्यस्थितीत सगळीकडे महागाईचा भस्मासूर पसरलेला आहे. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, महिला सर्वच स्तरातील लोकांना वाढत्या महागाईचा  सामना करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीला केंद्रातील व राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. ११ डिसेंबरला शासनाला जाब विचारण्यासाठी भाजपच्या वतीने भव्य मोर्चा काढून संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व सामान्य नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या सभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे यांनी प्रास्ताविकातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ध्येयधोरणावर टीकास्त्र सोडले. आमदार लखन मलिक, माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव, डॉ. विवेक माने यांचीही भाषणे झाली. सभेचे संचालन प्रशांत रत्नपारखी यांनी केले, तर आभार विनोद जाधव यांनी मानले. या सभेला भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गोलेच्छा, मालेगावचे सरपंच डॉ. विवेक माने, भाजयुमोचे जिल्हध्यक्ष विनोद जाधव, नारायण सानप, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव दाभाडे, मालेगाव बाजार समितीचे उपसभापती प्रा. आनंदा देवळे, अ‍ॅड. तिवारी, मीना काळे, सीमा साखरे, माजी सभापती पल्लवी बळी, संगीता राऊत, मालेगाव तालुकाध्यक्ष विजय गायकवाड, नितीन काळे, संजय केकण, नितीन िपपरकर, संदीप िपपरकर, राजू बळी, मुन्ना मुंदडा, मोहन बळी, पुरोहित यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकत्रे बहुसंख्येने उपस्थित होते.     

Story img Loader