पक्षनेत्यांची विनंती धुडकावत मुलीसाठी मंत्रिपदावर पाणी सोडणारे आणि राष्ट्रवादीमधून हकालपट्टी ओढवून घेणारे डॉ. विजयकुमार गावित यांच्या राजकीय भूमिकेला शह देण्यासाठी काँग्रेसने गनिमी काव्याचा आधार घेतला आहे. डॉ. गावितांचे राष्ट्रवादीतील गुरू अजित पवार यांच्या प्रचार सभांचे माणिकराव गावित यांच्यासाठी आयोजन करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव आखला आहे.
राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून डॉ. विजयकुमार गावित यांना अगदी हकालपट्टी होईपर्यंत ओळखले जाई, परंतु आघाडी विरोधात लोकसभा निवडणुकीत त्यांनी कन्या डॉ. हीना यांना भाजपची उमेदवारी मिळवून दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. जिल्ह्यात काँग्रेस विरोधात नेहमीच भूमिका घेणाऱ्या डॉ. गावित यांना राजकीय बळ देणारे अजित पवार यांची विनंती अव्हेरणाऱ्या डॉ. गावित यांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेसने आता अजित पवार यांनाच जाहीर सभांच्या रिंगणात उतरवण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात काँग्रेसने अजित पवार यांच्या दोन सभांचे नियोजन केले असून, या सभांना अजित पवारांनी समर्थन दर्शविले आहे. सभांची तारीख निश्चित होताच त्यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2014 रोजी प्रकाशित
काँग्रेसचा गनिमी कावा : डॉ. गावितांविरोधात अजित पवारांच्या सभा
पक्षनेत्यांची विनंती धुडकावत मुलीसाठी मंत्रिपदावर पाणी सोडणारे आणि राष्ट्रवादीमधून हकालपट्टी ओढवून घेणारे डॉ. विजयकुमार गावित यांच्या राजकीय भूमिकेला शह देण्यासाठी काँग्रेसने गनिमी काव्याचा आधार घेतला आहे.
First published on: 29-03-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress guerilla tactics against dr gavit