आगामी पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
..हा वसंतराव नाईकांचा अवमान -आ. राठोड
दिवंगत वसंतराव नाईक आमचे दैवत आहेत. त्यांच्या नावाने आयोजित वसंत अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनावर काँग्रेसने बहिष्कार टाकून त्यांचा खरा चेहरा पुढे आणला आहे. हा त्यांचा व शेतकऱ्यांचा हा अवमान आहे, अशा शब्दात शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आहे. मतांसाठी मात्र लाचार होऊन तुम्ही शेतकऱ्यांकडेच जाता ना. लाखो बंजारा समाजाच्या दैवताचा अवमान तुम्हाला करता येतो, मात्र या बांधवाच्या मतांची तुम्ही अपेक्षा ठेवता? दिवं. वसंतराव नाईक यांना जो समाज दैवत मानते ते ही बाब विसरणार नाही, हे काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवावे. शेतकऱ्यांनीही काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.
न. मा. जोशी, यवतमाळ
राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या भव्य स्वरूपाच्या वसंत अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनावर काँग्रेसने बहिष्कार टाकून नजीकची विधानसभा पोटनिवडणूक आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी न करता स्वबळावरच निवडणूक लढवायची, असा अप्रत्यक्ष संदेश देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दरी अधिकच मोठी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेत गेल्या ५० वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला धक्का देऊन राष्ट्रवादीने भाजप, शिवसेना आणि अपक्षाच्या मदतीने सत्ता मिळवल्याने काँग्रेसचा जळफळाट झालेला आहे. राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याची कोणतीही संधी सोडायची नाही, असा चंग काँग्रेसने बांधला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षांचे आणि हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री दिवं. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे निमित्त साधून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेतर्फे वसंत अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले. काल १८ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले, मात्र जिल्हा परिषदेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या एकाही नेत्याने किंवा साध्या कार्यकर्त्यांनेही उद्घाटन समारंभाला हजेरी न लावता आपला अघोषित बहिष्कार टाकला. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असलेल्या आणि वसंतराव नाईकांच्या नावाने आयोजित या प्रदर्शनावर काँग्रेसने बहिष्कार टाकून काय साधले, असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसने टाकलेल्या बहिष्कारामुळे राष्ट्रवादीचे नेते अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांना सर्वाधिक दु:ख झाले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, कृषी प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस नेते दिवं. आमदार नीलेश पारवेकर यांचा भव्य फोटो लावण्याची तयारी राष्ट्रवादीने केली होती, पण काँग्रेसच्याच काही नेत्यांनी यास अनुकूलता न दर्शवल्याने तो फोटोसुद्धा प्रवेशद्वारावर लागला नाही. या सर्व घडामोडींचा अन्वयार्थ आता इतका स्पष्ट झाला आहे की, जिल्ह्य़ात काँग्रेस-राष्ट्रवादीमधून विस्तवही जात नाही. काँग्रेस आमदार नीलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनामुळे यवतमाळ विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. परिणामत: यात काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने होणार, हे स्पष्ट आहे. यात काँग्रेसने कुणालाही उमेदवारी दिली तरी राष्ट्रवादीने त्या उमेदवारीला विरोध करीत आपला उमेदवार उभा करावा, अशी तीव्र भावना आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून हजर राहण्यास काँग्रेस नेते व कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, तर प्रमुख अतिथी म्हणून हजर राहण्यास पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके आदींनी मूकसंमती दर्शविली होती, मात्र प्रत्यक्षात यापकी एकाही नेता हजर नव्हता. इतकेच नव्हे, तर एक साधा कार्यकर्ता सुद्धा हजर राहणार नाही, याची काळजी काँग्रेसने घेऊन प्रदर्शनावर जो अघोषित बहिष्कार टाकला तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीत विळा-भोपळ्याचे सख्य असल्याच्या चच्रेला पाठबळच देणारा सिद्ध झाला आहे, एवढे मात्र खरे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा