अकोला लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उमेदवार आयात करावा लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. भारिप-बमसंचे नेते व अकोल्याचे माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन करून काँग्रेससोबत घरोबा करण्यास एक प्रकारे नकार दिल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आता काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत उमेदवार आयात करावा लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. जातीय समीकरणांच्या आधारावर उमेदवाराची घोषणा होण्याची चिन्हे आहेत.
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन करून नवा बिगुल फुंकला. या नव्या आघाडीमुळे ते काँग्रेससोबत आघाडी करण्याची सुतराम शक्यता नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता काँग्रेसला अकोल्यात उमेदवाराचा शोध घ्यावा लागत आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या विरोधात दमदार उमेदवार काँग्रेसला द्यावा लागेल, अशी मागणी काँग्रेस अंतर्गत गोटात चर्चिली जात आहे. महापालिकेतील विकास कामांना भाजपचा विरोध व प्रत्येक कामातील व्यत्यय यामुळे शहराचा विकास खुंटला असल्याची चर्चा काँग्रेस गोटात आहे. शहर विकास व जिल्ह्य़ाचा विकास करण्यासाठी काँग्रेसला नवा पर्याय लोकसभा निवडणुकीत द्यावा लागेल, अशी मागणी आता होत आहे.
पक्षात अनेक पर्यायांवर विचारविनिमय सुरू आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख यांना तिकीट देऊन काँग्रेस पुन्हा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे.
अनंतराव देशमुख यांना उमेदवारी मिळाल्यास रिसोड व मालेगाव या भागातील त्यांचा प्रभाव उपयोगी पडू शकतो, तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती राजकीय गोटातून मिळाली. पण, काँग्रेस नेते अनंतराव देशमुख यांनी लोकसभा उमेदवारीस नकार दिला, तर मात्र पक्षासमोर मोठी अडचण असून या दृष्टीने पक्षात जोरदार खलबते सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेला उमेदवार मान्य असेल, असे स्पष्ट करत नवे संकेत दिले आहे.
पक्षाने लोकसभेसाठी नवा चेहरा द्यावा, अशी मागणी पक्षातील दुसऱ्या एका गटाने केली आहे. त्यामुळे या पाश्र्वभूमीवर भाजपच्या विरोधात काँग्रेस सर्वच समाजाला चालणारा उमेदवार देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. नवखा उमेदवार व व्यापक जनाधार या आधारावर काँग्रेसची चाचपणी सुरू आहे.
 पक्षांतर्गत पातळीवर यासंबंधी अनेक बैठका गेल्या काही दिवसात झाल्या असून त्या बैठकींमध्ये पक्षात आयात केलेला उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे संकेत काँग्रेसमधील गोटाने दिले. त्यामुळे पक्षात आयात केलेला उमेदवार कोण, असा प्रश्न यानिमित्त समोर आला आहे. नेमक्या कुठल्या पक्षातून हा उमेदवार आयात केला जातो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
डाटाबेस तयार
अकोल्यात जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा क्रमवारीत निवडणूक होणार आहे. त्यामुळे या तीनही निवडणुकांसाठी जात, धर्म या आधारावर राजकीय पक्षांद्वारे सव्‍‌र्हे सुरू झाला असून काही पक्षांनी यात आघाडी घेतल्याची माहिती मिळाली. सव्‍‌र्हेची कामे पूर्ण झाली असून आता त्यावर प्रक्रिया करत जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा या मतदार संघातील उमेदवारांची चाचपणी पूर्ण होत आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले असून सव्‍‌र्हेच्या माध्यमांतून लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणूक जाहीर झाल्याबरोबर या सव्‍‌र्हेच्या माहितीनुसार राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लावतील. तसेच सव्‍‌र्हेतील माहितीच्या आधारे जिल्हा परिषद व विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.

Story img Loader