राहुल गांधींच्या आदेशानुसार दौरा

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आमदार के. एल. दुर्गेशप्रसाद यांनी बुधवारी मराठवाडय़ातील पक्षाची सद्य:स्थितीची नेते, पदाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. या वेळी मराठवाडय़ाच्या सर्व आठही लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. जालना लोकसभा मतदारसंघातील पक्षाची स्थिती व इच्छुक उमेदवारांचीही भेट घेऊन चाचपणी केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या आदेशानुसार दुर्गेशप्रसाद जालना दौऱ्यावर आले होते. ते आंध्र प्रदेश विधान परिषदेचे सदस्य असून राजमहेंद्री येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे मराठवाडय़ाच्या आठही लोकसभा मतदारसंघांतील पक्ष स्थितीच्या चाचपणीची जबाबदारी सोपविली आहे. मंगळवारी त्यांनी औरंगाबाद येथे त्या लोकसभा मतदारसंघातील पक्ष स्थितीची माहिती घेतली. या वेळी प्रमुख लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बंद दरवाजाआड चर्चा केली. औरंगाबाद जिल्ह्य़ातील पैठण, फुलंब्री व सिल्लोड या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश जालना लोकसभा मतदारसंघात आले. त्यामुळे या तीन विधानसभा मतदारसंघांतील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी औरंगाबाद येथेच मंगळवारी चर्चा केली. तर बुधवारी जालना येथे जालना, अंबड व भोकरदन या तीन विधानसभा मतदारसंघांतील पक्ष परिस्थितीविषयी निरीक्षक दुर्गेशप्रसाद यांनी चाचपणी केली. लोकप्रतिनिधींसह पक्षाचे पदाधिकारी, माजी आमदार त्याचप्रमाणे प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बंद खोलीत चर्चा केली. जालना जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आमदार विलासराव खरात, बाबुराव कुळकर्णी, जालना शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल हफीज, आर. आर. खडके पाटील, परसराम यादव इत्यादींसह अनेकांशी दुर्गेशप्रसाद यांनी यावेळी चर्चा केली. त्यांचा हा दौरा प्रसिद्धीपासून आणि माध्यमांच्या प्रतिनिधींपासून दूर ठेवण्यात आला होता.
जालना लोकसभा आणि भारतीय जनता पक्षाचा विजय हे समीकरण मागील पाच निवडणुकांपासून ठरले आहे. मागील पाचही लोकसभा निवडणुकांत जालना मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे या मतदारसंघाकडे या वेळेस काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे अधिक लक्ष असल्याचे सांगण्यात येते. या लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. जालना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भीमराव डोंगरे, आर. आर. खडके पाटील, विलासराव खरात, त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्य़ातून केशवराव औताडे व आमदार कल्याण काळे यांच्या नावाची इच्छुक उमेदवार म्हणून चर्चा बुधवारी येथे जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या परिसरात होती.     

Story img Loader