लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षातील ठाणेकर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दबाव वाढविण्यास सुरुवात केली असून ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या एका बैठकीत यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ‘जागा दाखवा’, अशी भाषा काँग्रेसी नेत्यांनी वापरल्याने ऐन निवडणुकांच्या तोंडावर या दोन पक्षांत शीतयुद्ध रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणुका जवळ आल्या की राष्ट्रवादीकडून आमचा वापर होतो. ‘एसईओ’सारखे साधे पद देताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शिवसैनिकांची निवड केली, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांना वाकुल्या दाखविल्या, असे जाहीर आरोप या बैठकीत करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समक्ष ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर भागातील काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नावाने अक्षरश: टाहो फोडल्याने या कार्यकर्त्यांची समजूत काढताना विखे-पाटलांनाही घाम फुटल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
येत्या गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भिवंडी येथे जाहीर सभा होणार असून या सभेच्या तयारीसाठी विखे-पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या ठाणे निरीक्षकांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची एक बैठक ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथील सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीसाठी ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर भागातील नेते, पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले होते. राहुल गांधी यांची सभा यशस्वी होण्यासाठी करावयाच्या तयारीसंबंधी विखे-पाटील मार्गदर्शन करीत असताना या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयी असलेल्या नाराजीचा पाढा वाचण्यास सुरुवात केल्याने या बैठकीचा नूरच पालटला. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका आल्या की राष्ट्रवादीचे नेते आमचा वापर करून घेतात, पुढे वर्षभर ढुंकूनही पाहत नाहीत, असा सुर काँग्रेसचे ठाण्यातील नेते मनोज िशदे यांनी लावताच नवी मुंबईतील नामदेव भगत आणि रमाकांत म्हात्रे यांनीही राष्ट्रवादीसंबंधी तक्रारींचा पाढा या वेळी वाचला. मीरा-भाईंदर भागातील काँग्रेसचे नेते मुजफ्फर हुसेन यांच्यासह या बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांनी तर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कार्यशैलीविरोधात भाषणे ठोकल्याने या पदाधिकाऱ्यांना आवरताना विखे-पाटलांना बरीच कसरत करावी लागली.

Story img Loader