लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचे धनी होताच ठाण्यातील ‘नाराज’ काँग्रेस कार्यकर्त्यांना अचानक कंठ फुटला असून पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त शहरात आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीसमोरच पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्ह्य़ातील काँग्रेसवर होणाऱ्या अन्यायाचा टाहो फोडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेसची अवस्था अगदीच तोळामासा असताना पक्षनेतृत्वाने वर्षांनुवर्षे येथील संघटनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जिल्ह्य़ातून विधान परिषदेवर नियुक्ती केलेले आमदार संजय दत्त आणि मुज्जफर हुसेन यांचे पक्षबांधणीसाठी योगदान काय, असा सवाल करीत ठाणे शहरातील कार्यकर्त्यांनी सत्त्वशीला चव्हाण यांना सोमवारी सायंकाळी अक्षरश: धारेवर धरले. सतत मुख्यमंत्र्यांमागे ‘दत्त’ म्हणून उभे राहणाऱ्यांनी कल्याणमध्ये कोणते दिवे लावले, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी या वेळी आपली नाराजी व्यक्त केली.
देशभरात आलेल्या मोदी लाटेमुळे यंदा काँग्रेसचे सगळ्याच ठिकाणी पानिपत झाल्याचे चित्र पुढे आले. ठाणे जिल्ह्य़ात मात्र पक्षाची ही अवस्था दोन दशकांपासून कायम आहे. सद्य:स्थितीत संपूर्ण जिल्ह्य़ातून राजेंद्र गावित हे काँग्रेसचे एकमेव निवडून गेलेले आमदार आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर पहिल्यांदाच निवडून गेलेल्या गावितांच्या गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ घालत पक्षनेतृत्वाने ग्रामीण भागात संघटनेला उभारी देण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र गावितांना त्यांच्या पालघर नगरपालिकेची निवडणूकहीजिंकता आली नाही. जिल्ह्य़ातील इतर भागांमध्ये संघटनेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी गावित नियमित हजेरी लावतात. मात्र त्यापलीकडे आपल्या कामाचा ठसा वगैरे त्यांना काही उमटविता आलेला नाही.

नाराज कार्यकर्त्यांना कंठ फुटला
ठाणे शहरात विधानसभेचे तीन मतदारसंघ असून जागावाटपात हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला आले आहेत. असे असले तरी येत्या निवडणुकीत यापैकी काही मतदारसंघांत पक्षाला सक्षम उमेदवार सापडेल का, अशी परिस्थिती आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातून काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर स्वत: इच्छुक असले तरी त्यांची संभाव्य उमेदवारी येथील राजकीय वर्तुळात आतापासूनच विनोदाचा विषय ठरू लागली आहे. ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ात पक्षाची अवस्था अतिशय बिकट असताना नेतृत्वाने कल्याणमधून संजय दत्त यांना, तर मीरा-भाईंदरमधून मुजफ्फर हुसेन यांना विधान परिषदेवर पाठविले आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांनी संघटना बांधण्यासाठी काय केले, असा थेट सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्त्वशीला यांना केल्याने कार्यकर्त्यांना समजविताना त्यांच्याही नाकी नऊ आल्याचे चित्र सोमवारी सायंकाळी टिपटॉप प्लाझा सभागृहात पाहावयास मिळाले. ठाणे शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी श्रीमती चव्हाण येथे आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी या वेळी दत्त आणि हुसेन या दोन आमदारांविरोधात टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांच्या सावलीत वावरणाऱ्या दत्त यांनी कल्याणमध्ये किती नगरसेवक निवडून आणले, असा थेट सवाल या वेळी काही कार्यकर्त्यांनी केला. राज्यात गेली १४ वर्षे काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, या सत्तेची फळे आमच्यापर्यंत कुठे पोहोचली, असा सवालही कार्यकर्त्यांनी या वेळी केल्याचे सांगण्यात येते. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) यांसारख्या पदांचे वाटप करतानाही काँग्रेस कार्यकर्त्यांना डावलले, असा आरोपही या वेळी काहींनी केला.  

Story img Loader