राजकारणात पिढय़ापिढ्या अनेक घराणी काम करीत असताना नवीन पिढी समोर येऊ लागली आहे. २१ व्या शतकात प्रवेश करताना देशाला तरुण नेतृत्वाची गरज असल्याचे बोलले जात असले तरी ते सामान्यांमधून निर्माण न होता पिढयापिढय़ा राजकारण करणाऱ्या घराणेशाहीचेच वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवं. भाऊ मुळक यांच्या घराण्यातील तिसरी पिढी अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचा चिरंजीव यशराज मुळक यांच्या रुपाने राजकारणात समोर आली आहे.
भाऊ मुळक यांनी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांचा मुलगा राजेंद्र मुळक यांनी एनएसयूयच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. जिल्हा परिषद सदस्यापासून ते आमदार आणि आता राज्यमंत्री म्हणून राजेंद्र मुळक यांनी राजकारणात स्वतचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र मुळक यांची ग्रामीण काँग्रेसमध्ये चांगली पकड निर्माण झाली आहे. शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळाले आहे. आता वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत यशराज मुळक राजकारणात उतरले असून त्यांची नुकतीच एनएसयूआयच्या महासचिवदी निवड झाली आहे.
एनएसयूआयची नुकतीच प्रदेश कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात यशराजला १२३८ मते मिळाली आहेत. दिवं. डॉ. श्रीकांत जिचकार, केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, नाना गावंडे, माजी आमदार सागर मेघे, सर्व काँग्रेसची नेते मंडळी एनएसयूआयमध्ये काम करून समोर आली आहे. राजेंद्र मुळक यांनीही अनेक वर्ष एनएसयूआयमध्ये काम केले आहे. शहरात एनएसयूआयच्या आंदोलनात किंवा कुठल्याही कार्यक्रमात फारसे समोर न आलेल्या यशराज मुळक यांच्या पाठिशी केवळ राजकीय घराण्याचा वारसा असल्यामुळे त्यांची थेट प्रदेश पातळीवर नियुक्ती करण्यात आली आहे. एनएसयूआय ही राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांची संघटना असून मागील चार दशकापासून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देत आहे. यशराज मुळक कमला नेहरू महाविद्यालयात बी.कॉम. दुसऱ्या वर्षांला आहे. रोजगार हमी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल यापूर्वीच एनएसयूआयमध्ये सक्रिय झाले असून त्यांची प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे.आता यशराज मूळक यांच्या रुपाने नागपुरात नवे नेतृत्व समोर आले आहे. नितीन राऊत आणि राजेंद्र मुळक राज्य सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे त्याचे अनुकरण करीत ही पिढी समोर येईल की राजकारणात स्वतचे वेगळे अस्तित्व निर्माण करणार? हे येणारा काळ ठरविणार आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा